एका नाक्याची ऐतिहासिक समृद्धता!

मुंबई बंदर म्हणून उदयास यायच्या आधी मुंबईपासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर एक आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर अस्तित्त्वात होते हे किती जणांना माहित आहे? इसवीसन पूर्व कालखंडापासून सतराव्या शतकापर्यंत जगाच्या नकाशावर दिमाखात उभे असलेले पश्चिम किनारपट्टीवरील असे हे एकमेव ठिकाण होय. ज्याकाळी संजान-चिंचणी हे महामुंबईचे उत्तर टोक होते त्याकाळी दक्षिण टोकाचा मान या बंदराकडे होता. मुंबई बंदराच्या निर्मितीनंतर आजवर कधीही जितकी जहाजे या बंदराने पाहिली नसतील त्याच्या कितीतरी पटींनी अधिक जहाजांचे आदरातिथ्य या बंदराने केले आहे. एव्हाना काही लोकांनी जागेचा अंदाज बांधला असेल आणि तो अंदाज नक्कीच 'अलिबाग' हा असेल. पण हा अंदाज चुकीचा आहे. पर्यटक अलिबाग आणि मुरूड-जंजिराला आवर्जुन भेट देतात पण या प्रवासाच्या दरम्यान येणारा एक नाका कायम दुर्लक्षित राहतो. हा नाका म्हणजे 'चौल नाका'. पण चौल हे केवळ नाक्यापुरते मर्यादित नसून एकेकाळचे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर होते, याची अनेक जणांना माहिती नसते. म्हणूनच चौलला आवर्जुन भेट द्यायला हवी.

दोन हजार वर्षापूर्वी भारतीय उपमहाद्विप आणि पश्चिम आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी संबंध होते. हे व्यापारी अलिबागजवळील चौल बंदरात दाखल होत. जागतिक पातळीवर चौल व्यापारी बंदर म्हणून नावाजलेले असले तरी त्याचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे. काळासोबतच या शहराचे शासकही बदलत गेले आणि त्यापद्धतीच्या वास्तू येथे उभ्या राहिल्या. त्यामुळे चौलमध्ये फिरताना वास्तूंच्या वेगवेगळ्या रचना नजरेस पडत राहतात. बौध्दकालिन गुंफा, निजामशाही काळात बांधल्या गेलेल्या वास्तू, पोर्तुगीजांचे किल्ले आणि अलिकडच्या काळातील हिंदू मंदिरे असणारे कदाचित हे सर्वात समृद्ध बंदर होय.

चौल परिसरातील रेवदंडा किल्ला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. चौलच्या बंदरातून रेवदंडा किल्ल्यात यायला दोन मुख्य दरवाजे आहेत. एक जमिनीच्या मार्गाने आणि दुसरा समुद्री मार्गाने. पाण्याच्या मार्गाने येणारा मुख्य दरवाजा दक्षिण दरवाजा म्हणून ओळखला जातो. रेवदंडा पुलाच्या समोरून पाहिल्यास हा दरवाजा नजरेस पडतो. कुठल्या कालखंडात कोण इथं आलं, कुणी कुठलं बांधकाम केलं याबाबतचे सर्व शिलालेख इथल्या किंल्ल्यांच्या भिंतींवर कोरलेले आहेत. बंदरातून किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठीच्या प्रवेशद्वारापासून २०० मीटरवर अठरा ते वीस फूट उंच एक भिंत आहे. भिंतीची जाडी आणि खिडक्यांची रचना पाहता त्याकाळी ही संपूर्ण वास्तू किती मजबूत आणि कलात्मक असेल याची कल्पना येते. चौल परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे घुमट जागोजागी नजरेस पडतात. यापैकी भोवाळा तलावाकाठी असेलला दगडी घुमट आणि आणि त्यावरील कलाकुसर नितांतसुंदर आहे. या घुमटापासून जवळच एक कलावंतीणीचा वाडा प्रसिद्ध आहे. हा वाडा सध्या भग्नावस्थेत असला तरी आवर्जुन भेट देण्यासारखा आहे. आणखीन एक वास्तू म्हणजे हमामखाना. या हमामखान्यामधील हौदांची रचना अशी करण्यात आली होती की तिथे वेगवेगळ्या तापमानाला पाणी उपलब्ध होईल. हमामखान्यापासून चालण्याच्या अंतरावर एक मशिद आहे. फारशी भाषेतील शिलालेख तुम्हाला इथे वाचायला मिळेल. या परिसरातील वास्तू अतिशय सुंदर रितीने घडवलेल्या आहेत. प्रत्येक वास्तूचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्या कोणत्या काळात आणि कुणी घडविल्या याची माहिती त्यावरील शिलालेखांवरून मिळत राहते.

चौल परिसरातील काही वास्तूंच्या भिंतींवर संगमरवरी दगडावर इंग्रजी आणि मराठी भाषेतील फलकही कोरून ठेवण्यात आले आहेत. जगप्रसिद्ध असामी सेंट झेवियरने जगभरात प्रवचनं दिली त्यापैकी एक प्रवचन चौलमध्ये दिले होते. त्या सेंट झेवियरच्या नावाने असलेले चॅपेल पाहण्यासारखे आहे. या चॅपेलच्या पुढेच एक डॉमिनिकन चर्चदेखील आहे. या चर्चचे बांधकाम आणि स्थापत्यरचना पाहिल्यास त्याकाळातील कलाकारांच्या प्रतिभेचा अंदाज येतो. त्याच्या पुढे गेल्यावर एक सात खणी टॉवर आहे. हल्ली फोटोसेशनसाठी हा टॉवर पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असतो.

चौलचे आणखी एक आकर्षण म्हणजे कोर्लईचा किल्ला. किल्ल्याच्या पायथ्याशीच लाईटहाऊस आहे. लाईटहाऊसमध्ये पर्यटकांना प्रवेश असून येथील कर्मचारी लाईटहाऊनसची रचना, कार्य आणि महत्त्व समजावून सांगतात. एका छोट्याश्या टेकडीवर बांधलेल्या कोर्लई किल्ल्यावर जाण्यासाठी कोळीवाड्यातून जावं लागतं. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर पायथ्याशी दिसणारा वळणं घेत जाणारा छोटासा रस्ता आणि लाईटहाऊस पाहताना एखाद्या युरोपातील देशामध्ये आल्यासारखं वाटतं. किल्ल्याचं भौलोलिक महत्त्व किल्ल्यावर पोहोचल्यावर कळतं. किल्ल्यावर अनेक तोफा आजदेखील पाहायला मिळतात. कुंडलिका नदीच्या बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे दर्शन होते. किल्ल्यावरील बालेकिल्ल्याच्या भागात चर्च, पुढे महादेवाचे मंदिर आणि एक गोड्या पाण्याची विहिरदेखील आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडील बुरूजावरून पाहिल्यास पूर्वेला कुंडलिका नदी आणि पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र दिसतो. या किल्ल्याच्या एका पावसाळी भेटीत पश्चिमेकडून बरसत येणारा, किल्ल्यावर आम्हाला भिजवून पूर्वैकडे मार्गक्रमण करणारा पाऊस अनुभवता आला होता.

आज चौल एक शांत गाव दिसते. पण गावातून फिरताना वास्तूंच्या परिसरात, शेतांमध्ये आजही पुरातन वस्तूंचे तुकडे, नाणी सापडतात. चौलला भेट देऊन परतीच्या वाटेला लागताना एक छोट्याशा डोंगरावर निझामशाही काळात बांधलेले मोठे चौकोनी थडगे दिसते. हे थडगे कुणाचे आहे याचा शोध अजूनही सुरू आहे. अनेक लहानमोठ्या वास्तू इथे निपचित पडून असल्या तरी एकेकाळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंदर असलेल्या या गावाला भेट देणे अगत्याचे ठरते.

एका नाक्याची ऐतिहासिक समृद्धता!
चौल केवळ नाक्यापुरते मर्यादित नसून एकेकाळचे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर होते! Choul Naka Historical port pvk99

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे