अंतरंग परिचय
अंतरंग परिचय लेखांचे वर्गीकरण - शरीरखंडातील अनेक विषयांपैकीं सुमारें पांचशें विषय या विभागांत प्रसिद्ध होत आहेत. त्यांचें शास्त्रवार वर्गीकरण केल्यास असें दिसून येईल कीं, हा भाग बर्याच शास्त्रांचें व अनेक भागांचें आणि त्यांच्या सांस्कृतिक व राजकीय इतिहासाचें विवेचन करणारा आहे. प्रथमत: हिंदुस्थानांचा इतिहास विचारांत घेतां असें दिसून येईल कीं त्याचा बराचसा भाग या विभागांत आला आहे. हिंदुस्थानच्या इतिहासाचे भाग म्हणजे वैदिक संस्कृति, सूतसंस्कृति, बौद्धजैनप्रामुख्य काल, प्राचीन ऐतिहासिक काल, म्हणजे. शैशुनागांपासून मुसुलमानी स्वारीपर्यंतचा काल, मुसुलमानी अमदानी, मराठ्यांचें वर्चस्व, असे अनेक काल पडतील. यापैकीं बहुतेक कालांवर या विभागांत लेख आहेत. यांतील वैदिक संस्कृतिकालाविषयीं पाहातां, वैदिक वाङ्मयांपैकीं अथर्ववेदावरील लेख एकदम नजरेपुढें येईल. वैदिकधर्माविषयीचे म्हणजे, प्राचीन श्रौतस्मार्तधर्मावरील, लेख म्हणजे अग्निष्टोम, अघमर्षण अत्यग्निष्टोम हे होत. हे सर्व लेख “वेदविद्या” विभागाचे पूरक म्हणतां येतील. सूतसंस्कृतिविषयक माहिती द्यावयाची म्हणजे पुराणें हें साहित्य समजून त्याचा अभ्यास ...