मुंबई
पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड
प्रकरण ६ वें
हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन.
मुंबई, इतिहास- प्राचीन काळीं आर्य लोक सिंधुनदाच्या कांठी वस्ती करून राहत होते. त्यावेळीं द्रविड लोक पश्चिमकिनार्यावर किल्ल्यांत व खेड्यांत रहात असत. त्यांनां नेहमीं लागणार्या घरगुती धंद्यांचे ज्ञान होतें. ते भूतपिशाच्चपूजक होते. त्यांच्या मुख्य देवतेचें नांव 'को' असें होतें. ख्रिस्तपूर्व १००० या सुमारास आफ्रिका व बाबिलोन या भागांशीं येथील लोकांनीं व्यापारसंबंध ठेविला होता. इराणच्या आखाताच्या मार्गानें त्यांनां विटा करणें, ब्राह्मी मुळाक्षरें, राशी, नक्षत्रें, वजनें वगैरे यांचें उपयुक्त ज्ञान प्राप्त झालें असें संशोधकांचे मत आहे. इराणी लोकांनीं जेव्हां सिंधुनदाच्या लगतचा प्रदेश जिंकला, त्यावेळेस पाषाणशिल्प, नाणीं पाडणें या कला या देशांत आल्या असाव्यात.
मौर्यवंशीय अशोकाच्या सत्तेखालीं म्हैसूरपर्यंत सर्व मुलूख होता. त्यावेळीं पश्चिमभाग उज्जनीच्या सुभ्याकडे होता. या वेळीं पश्चिमभागांत आर्यसंस्कृतीची छाप लोकांच्या चालीरीतींत दिसून येत होती व येथील लोक हिंदु झाले होते असें म्हणण्यास हरकत नाहीं. याच काळीं ग्रीक साम्राज्याशीं हिंदुस्थानचा व्यापार चालू होता. अशोकमागून ''बॅक्ट्रीयन, ग्रीक, अपोलोडोटस व मिन्यांडर यांचें राज्य सिंध व काठेवाडांत असावें असा इतिहासकारांचा तर्क आहे. मौर्यामागून पैठणच्या (गोदावरीच्या काठीं) सातवाहनांच्या राज्यांत नाशक व पश्चिमघाटापर्यंतचा मुलूख मोडत असे (ख्रिस्तपूर्व १५०). हे राजे आंध्र या नांवानें प्रसिद्ध आहेत. ख्रिस्तपूर्व २०० च्या सुमारास सातवाहनांचें राज्य फार भरभराटींत होतें. याच सुमारास सिथियन लोक उत्तर व पश्चिम हिंदुस्थानांत आले.
इ.स. ४० च्या सुमारास रोम शहराशीं पश्चिम हिंदुस्थानाचा व्यापार सुरू झाला. इ.स. १२० ते ३०० पर्यंत गुजराथेंत व उज्जनी येथें क्षत्रपांचें राज्य होतें. ह्यांच्यांत रुद्रदामन् नामक एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. त्याच्या राज्याचा विस्तार सिंधुनदाच्या मुखापासून तों दमणगंगेच्या मुखापर्यंत होता व अंतःप्रदेशांत मुलतानपासून भेलसापर्यंत त्याच्या राज्याची सरहद्द पसरली होती. दक्षिणेंत दमणगंगेपासून तों बनवासीपर्यंत व पूर्व किनार्यापासून तों पश्चिम किनार्यापर्यंत सातवाहनांचें राज्य होतें. त्याचा लय २१० च्या सुमारास झाला. यावेळीं या राज्यांत धरणकटक ( सध्यांचें धर्णीकोट), तेर व पैठण हीं प्रसिद्ध शहरें होतीं. क्षत्रप व सातवाहन यांचें जो पर्यंत सख्य होतें तों पर्यंत जिकडे तिकडे शांतता नांदत होती व व्यापाराची भरभराट होत होती. याच वेळीं मोठमोठ्या रस्त्यांवर लेणीं कोरण्यांत आलीं. क्षत्रप हे जरी परकीय लोक होते तरी त्यांनीं ब्राह्मणी विद्येस अतिशय उत्तेजन दिलें. सातवाहनांनीं प्राकृत भाषेस आश्रय दिला होता. पैठणच्या घराण्याचा र्हास झाल्यावर भडोच हें यूरोपाशीं चालणार्या व्यापाराचें केंद्रस्थान झालें व क्षत्रपांनीं आपल्या राज्याचा विस्तार कल्याणपर्यंत नेऊन भिडविला. २७३ सालीं यूरोपमधील पालमायरा शहराचा नाश झाला व ३०० सालीं क्षत्रपांचें राज्य लयाला गेलें. त्या वेळेपासून यूरोपियन देशाशी चालू असणार्या व्यापारास उतरती कळा लागली.
चवथ्या शतकापासून पुढें सुमारें १५० वर्षांचा इतिहास बरोबर माहीत नाहीं. गुजराथेंत क्षत्रपांची लहान लहान राज्यें होतीं त्यांचा र्हास होऊन मगधचे गुप्त वंशांतले राजे राज्य करूं लागलें. देशावर व कोंकणांत अशींच लहान लहान राज्यें असावीत असें तज्ज्ञांचें अनुमान आहे. पांचव्या शतकाच्या उत्तरार्धांत श्वेतहूणांच्या स्वार्या होऊं लागल्या व नर्मदेपर्यंतचा सर्व प्रदेश त्यांनीं व्यापिला. काठेवाडांत गुप्ताचें राज्य मोडून तेथें वलभी घराण्यानें आपली सत्ता स्थापन केली (५०० ते ७७०). अगदीं दक्षिणेंत त्रैकुटांचें राज्य होतें. हे नवीन लोक पुढें हिंदूंमध्यें मोडूं लागले. ब्राह्मण धर्माचें वर्चस्व होऊन बौद्ध धर्माच्या र्हासास सुरुवात झाली. इराणी व अरबी संस्कृतीचा ठसा या देशांतील संस्कृतीवर युरोपियन संस्कृतीपेक्षां अधिक वठूं लागला. उत्तर कोंकणांत मौर्य राज्य या कालीं पुरी (मुंबईजवळ) येथें भरभराटींत होतें. दक्षिणेंत किनार्यावरच्या भागीं बनवासीचे कदंब होते. दक्षिण महाराष्ट्रांत चालुक्यवंशीय राजे व राष्ट्रकूट यांच्यामध्यें झगडा चालला होता. गुर्जर लोक हूणांबरोबर आले असावेत. त्यांनीं पंजाब, राजपुताना, काठेवाड हे प्रांत जिंकून (५७५-७४०) भडोच येथें राज्य स्थापिलें. हे रजपुतांचे पूर्वज होत असें कांहीचें म्हणणें आहे. कनोजच्या हर्षवर्धन (६०६-४०) राजाचा अंमल सर्वत्र बसण्याचा रंग दिसूं लागला पण हर्षाच्या मृत्यूमुळें तसें घडलें नाहीं. इ.स. ६०० च्या सुमारास चालुक्यांनीं राष्ट्रकूटांचा व त्रैकूटांचा पराभव करून आपल्या राज्याचा विस्तार वाढविला. यांच्या ताब्यांत ७ व्या शतकांत घाटावरचा प्रदेश (दक्षिण पठार) व कोंकण हे भाग होते. यांच्या धाकट्या पातीचें राज्य कृष्णेच्या मुखाजवळ ''वेंगी'' येथें होतें.
चालुक्य जरी शिव व विष्णुपूजक होते तरी दक्षिणेंत जैन धर्म चालू होता. वेरूळ व अंजिठा येथें बौद्धसंघ होते. ८ व्या शतकांत मुसुलमानांनीं हिंदुस्थानांत प्रवेश केला (७११). ७५० मध्यें चालुक्यांच्या राज्यास उतरती कळा लागली. मुसुलमानांनीं गुजराथेंत स्वारी करून (७७०) वल्लभी शहराचा नाश केला. या धामधुमींत चावडा रजपुतांनीं अनहिलवाड येथें राज्य स्थापन केलें. त्यांस गुजराथच्या भिनमालांची मदत होती. गुर्जरांनीं राजपुताना माळवा आपल्या कबज्यांत घेऊन कनोज येथें आपली राजधानी स्थापन केली. या राज्याचीं शकलें होऊन, अजमीर येथें चव्हाणांचें, धार येथें परमारांचें आणि अनहिलवाड येथें चावडांचें अशीं स्वतंत्र संस्थानें झालीं. गुजराथेंत वाङ्मयाचीहि वृद्धि झाली.
राष्ट्रकूटांनीं चालुक्यांचा पाडाव करून (७५०) गुर्जरांच्या तोडीचें नवें राज्य निर्माण केलें. हीं दोन्हीं राज्यें २०० वर्षे अस्तित्वांत होतीं (७५०-९५०). चालुक्यांचा पराभव झाल्यावर ते म्हैसूर प्रांतांत गेले. राष्ट्रकूटांनीं मालखेड (सोलापूर जिल्ह्यांतील) येथें आपली राजधानी केली. राष्ट्रकूट हे शैवमतानुयायी होते. अरब लोकांनां यांच्यांतील वल्लभ राजाची माहिती होती. हा राजा महाराष्ट्रात अमोघवर्ष या नांवानें प्रसिद्ध होता. या अमदानींत इराणच्या आखातालगतच्या मुलुखाशीं पुन्हां व्यापार सुरू झाला. ७७५ सालीं पार्शी लोक हिंदुस्थानांत आले. ९४१ अथवा ९६१ च्या सुमारास मूळराज सोळंकी नामक गुर्जराधिपतीनें अनहिलवाडचें राज्य आपल्या ताब्यांत घेतलें. ९७३ च्या सुमारास दक्षिण हिंदुस्थानांत राज्यक्रांति झाली. त्यांत चालुक्यांनीं राष्ट्रकूटांचा पाडाव करून कल्याण ही राजधानी करून तेथें आपलें राज्य स्थापन केलें. या कामीं तैल या चालुक्यवंशीय पुरुषानें पुढारीपणा स्वीकारला होता. याच्या बारप्पा नामक अनुयायानें दक्षिण गुजराथेंत राज्य स्थापन केलें.
गुजराथेंत मूळराजाच्या वंशजांनीं अनहिलवाड येथें ११०३ पर्यंत राज्य केलें. हे शैवमतानुयायी असून सोमनाथ हें त्यांचें दैवत होतें. गिरनारचे चूडासमा (९४०- ११२५) हे त्यांचे शत्रू होत. अजमीरच्या चव्हाणांनीं यांस बराच त्रास दिला. ११३४ त मूळराजाच्या वंशांतील जो सिंधुराज त्यानें परमारांचा पराभव करून उज्जनी आपल्या ताब्यांत घेतली. त्यांचे व चालुक्यांचें कांही काल भांडण झाल्यावर सख्य झालें. १०२६ सालच्या महमद गझनीच्या स्वारीनें यांचा नाश होतो कीं काय अशी भीति वाटत होती पण त्या स्वारीचा चिरस्थायी असा परिणाम झाला नाहीं.
महाराष्ट्रांत ९७३ ते ११५५ पर्यंत कल्याणीचे चालुक्य राज करीत होते. यांनीं प्रत्येक प्रांतावर जो सुभा नेमिला त्याजकडे तो प्रांत वंशानुवंश ठेवण्याची पद्धत स्वीकारल्यामुळें हे सुभेदार बलिष्ठ होऊन चालुक्यांच्या राज्यास उतरती कळा लागली. यांनीं माळव्याच्या परमारांचा पराभव केला व जबलपूर नजीकच्या त्रिपुरीच्या कलचुरी राजांस जिंकिलें. यांच्या दरबारी कवी व पंडित होते. यांनीं मुसुलमानांस सवलती दिल्या व व्यापार करण्यास उत्तेजन दिलें. ११२० च्या सुमारास म्हैसूरचा सुभेदार फार बलिष्ठ झाला व त्यानें चालुक्याशीं स्पर्धा करण्यास सुरुवात केली. ११५५ नंतर चालुक्यांचें कलचुरी रज्याशीं युद्ध सुरू झालें. कलचुरी राजा हा त्यांचा मांडलिक होय. याच वेळेस म्हैसुरांत होयसळ राजा स्वतंत्र झाला. उत्तर महाराष्ट्रांत यादवांचें प्रस्थ माजलें. होयसळ वंशांतील राजपुरुषांनीं कलचुरी व चालुक्यांचा पराभव करून नंतर यादवांचा पाडाव केला. यादवांच्या सिंघण राजानें म्हैसूरधिपतीचा पराभव करून महाराष्ट्राचें आधिपत्य मिळविलें (१२१२). मूलराजांच्या वंशांतील राजे आपणास सोळंकी म्हणवती असत. त्यांनीं सुभे नेमण्यांत चालुक्यांची रीत स्वीकारली. त्यांच्या राज्यास ११५५ पासून उतरती कळा लागण्यास सुरुवात झाली. मूल राजाच्या वंशाचा क्षय झाल्यावर गुजराथचें राज्य घोलक्याच्या वाघेल्यांकडे आलें. धोलक्याचे वाघेले हे सोळंकी वंशांतील होते. पूर्वीच्या राज्याचा विस्तार आकुंचित होऊन या नवीन घराण्याकडे फक्त गुजराथचा कांही भाग व पूर्वेकडचा काठेवाडांतील मुलुख राहिला. यांनां यादव राजांशीं तह करणें भाग पडले. ही सर्व राज्यें कमकुवत झालीं होतीं, तरी पण देवळें बांधण्याचें काम चालू होतें व दरबारी भाटांचा भरणा पूर्ववतक होताच. १२९८ त अल्लाउद्दीनच्या भावानें म्हणजे आलफखानानें एका स्वारींत हें राज्य जिंकून घेतलें. थोड्यात अवधींत यादवांच्या सत्तेचा अंत झाला. यादवांचें राज्य बरेंच भरभराटलें होतें. अल्लाउद्दीन खिलजीनें १२९४ सालीं रामचंद्र यादव राजाचा पराभव करून त्यास खंडणी देम्यास भाग पाडिलें. १३१८ त यादव कुळाचा समूळ नाश होऊन दख्खनच्या भागांत मुसुलमानांचें प्राबल् माजलें.
गुजराथ व काठेवाडः- गुजराथवर राज्य करण्यासाठीं दिल्लीहून सुभे येत असत. त्यावेळीं या राज्यांत पाटण, बडोदें, खंबायत, तापी व भडोचच्या लगतचा मुलूख मोडत होता. या राज्यांत त्यावेळीं मोंगलांच्या व काठेवाडांतील हिंदु राजांच्या धामधुमीमुळें शांतता नव्हती. दिल्लीची सत्ता जेव्हां कमकुवत झाली तेव्हां येथील जाफरखान नामक सुभेदारानें स्वातंत्र्य जाहीर करून तो गुजराथचा राजा बनला (१४०७). हें राज्य १४०७ पासून तो १५७२ पर्यंत अस्तित्त्वात होतें. १५७२ सालीं अकबर बादशहानें तें जिंकून घेतलें. अकबरानें हें राज्य जिंकण्यापूर्वी व ऐन भरभराटीच्या काळांत यांत उत्तर गुजराथ (अबूपासून तो नर्मदेपर्यंत), काठेवाड, तापीच्या लगतचा मुलूख व सुरतेपासून मुंबईपर्यंतचा भाग (घाट व समुद्र यांमध्यें असलेला) हा सर्व प्रदेश येत असे.
अहमद- बिन-तुघ्लखानें दख्खन जिंकून राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्याचें ४ भाग केलें. राज्यव्यवस्थेकरतां मुसुलमान कामगार त्यानें नेमिले होते. सैन्यावर मोंगल व अफगाण कामगार असत. सैन्यावरच्या अधिकार्यांनीं बंड उभारून ब्राह्मणी राज्याची स्थापना केली. याचा पहिला सुलतान हसगंगु बहामनी हा होता. या राज्याचा मोड १५२६ सालीं झाला खरा पण राजकीय दृष्ट्या याचें महत्त्व १४८२ सालीं नाहीसें झालें. या राज्यांत मोठमोठे वीर, मंत्री आणि राज्यकार्यधुरंधर पुरुष उत्पन्न झाले, राज्यांत शांतता नांदत होती, या राज्याच्या सत्तेचें आगर दौलताबाद व कलबुर्गा यांमधील प्रदेशांत होतें. या राज्याची सीमा १४७२ त बंगालच्या उपसागरापर्यंत गेली होती. कृष्णेच्या दक्षिणेस लहान लहान हिंदु राज्यें होतीं, त्यांत विजयानगरचें राज्य मुख्य होतें. कोंकणांत मुसुलमानी अमलाचा जम चांगला बसला नाहीं, त्यांच्या ताब्यांत फक्त कांही डोंगरी किल्ले होते. १५ व्या शतकाच्या अखेर बहामनी राज्याचीं चार शकलें झालीं. ती विजापूर, गोवळकोंडा, बेदर व अहमदनगर हीं होत. अहमदनगरच्या निझामशाहीचा उगम ब्राह्मणापासून झाला असल्यामुळें त्यांत ब्राह्मणांचा फार भरणा होता. चौल हे त्यांचें बंदर होतें. गोदावरीच्या पाणवठ्याचा प्रदेश नांदेडपर्यंत त्यांत मोडत असे. सध्यांच्या नाशिक, सोलापूर, पुणें, नगर या जिल्ह्यांच्या बर्याच भागाचा त्यांत समावेश होत असे. या सुलतानांचें आपसांत भांडण चालत असे व ते विजयानगरच्या राजाची मदत घेत असत. पण १५२६ सालीं या सुलतानांनीं एकी करून पुढें १५६५ त विजयानगरचा नाश केला. अहमदनगरच्या सुलतानानें १५७२ त वर्हाड घेतलें व विजापूरकरांनीं दक्षिण जिंकण्यास सुरुवात केली. या सुलतानांची आपसांत युध्दें नेहमीं चालत असत. १५९९ सालीं मोगंलांनीं खानदेश घेतला व १६०० मध्यें अहमदनगर काबीज केलें. पंधराव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज लोकांनीं दक्षिण किनार्यावर पाऊल ठेवण्यास आरंभ केला. त्यांनीं अंजदीव, दिव १५३५, गोवा (१५३०), चौल (१५३१), वसई (१५३४), हीं आपल्या कबज्यांत घेतलीं व हिंदी महासागरावर आपली सत्ता कायमची स्थापित केली.
१६ व्या शतकाच्या अखेर, सिंध, गुजराथ व खानदेश यांचा मोंगलांच्या राज्यांत समावेश होत होता. राज्यकारभारांत शिस्त चांगली नव्हती. जमिनीच्या वसुलापैकीं १/३ भाग कर म्हणून सरकारांत जमा होत असे. गुजराथेंत १७०७ पर्यंत शांतता होती. या प्रांतांतून मोंगलास दोन कोट रुपये उत्पन्न होत असे.
१७०५ पासून नर्मदेच्या उत्तरभागांत मराठ्यांनीं स्वार्या करण्यास आरंभ केला. चंपानेर (१७२३) व बडोदें (१७३४) येथें त्यांनीं आपली सत्ता स्थापित केली. पुढें मराठ्यांनीं चौथाई व सरदेशमुखीचा हक्क या भागांत शाबीत केला. यावेळेस (१७४८) या भागांत अतिशय अंदाधुंदी माजली होती. जुनागड (१७३८) बालासिनोर (१७२५) व खंबायत (१७३०) या भागांत लहान लहान राज्यें अस्तित्वांत आलीं. १७३७ मध्यें गायकवाडास या भागाचें अर्धे उत्पन्न मिळूं लागलें. गायकवाडांनीं १७३८ त अहमदाबाद मोंगलांच्या सुभ्यासह व्यापला.
अहमनदगर मोंगलांनीं घेतल्यावर मलिकंबरानें खडकी (औरंगाबाद) येथें निझामशाही स्थापन केली व हें राज्य मलिकच्या मृत्यूपर्यंत दख्खनच्या प्रदेशांत अबाधित राहिलें. १६३० त निजामशाही कायमची बुडविण्यांत आली. याचा विजापूरकरांनीं फायदा घेऊन आपल्या ताब्यांत भीमा व नीरा यांमधील मुलूख व उत्तरकोंकण घेतलें. १६३३ ते १६५६ पर्यंत मोंगलांनीं आपली सत्ता दक्षिणेंतील जिंकलेल्या भागांत दृढ करण्याचे प्रयत्न केले. या धामधुमीच्या काळांत मराठ्यांनां राजकारणमाचें व शिपाईगिरीचें शिक्षण मिळालें. त्यांनां शिवाजीसारखा पुढारी मिळाल्याबरोबर त्यांनीं राज्य स्थापन करण्यास सुरुवात केली. शिवाजीनें (१६४६ ते १६४८) भीमा व नीरा यांमधील मुलूख घेतला, मोंगलांच्या व विजापूरकरांच्या मुलुखांत स्वार्या करण्यास सुरुवात केली. आदिलशहाच्या मरणानंतर सातारा, फोंडा, व पन्हाळा हा भाग आपल्या राज्यास जोडिला, कारवार व अंकोला (१६७२ ते ७६) सर केला. कोपळ व बल्लारी आपल्याकडे घेतली (१६७६ ते १६७७). मोंगलांनी स्वारी करून सोलापूर व त्यालगतचा मुलूख विजापूरतरांकडून आपल्या राज्यास जोडिला.
शिवाजीचा अंत होतांच दक्षिण जिंकण्याची संधि आली आहे असें औरंगझेबास वाटलें.तो मराठ्यांची व विजापूरकरांची सत्ता कमी होण्याची वाटपहात होता. त्यानें १६८६ त गोवळकोंडा व १६८७ त विजापूर सर करून ही राज्यें बुडविलीं व १६८९ त संभाजीचा वध केला. पण याचा परिणाम फार विपरीत झाला. मराठे लोकांनीं जिकडे तिकडे धुमाकूळ घालण्यास आरंभ केला. १६९९ ते १७०५ या अवधींत औरंगझेबानें मराठ्यांच्या डोंगरी किल्ल्यांस वेढा घालून ते सर करण्याचे प्रयत्न केले. इकडे मराठ्यांनीं आपले घोडेस्वार गुजराथेंत व माळव्यांत पाठविले. मराठ्यांनीं गनिमी काव्याचा आश्रय केला व सर्व किल्ले पुन्हां परत मिळविले. औरंगझेब १७०७ सालीं मरण पावला व लागलीच सर्व मोंगल सैन्य दिल्लीस परत बोलावण्यांत आलें. कोल्हापूर व सातारा येथें दोन राज्यें स्थापन झालीं.
बाळाजी विश्वनाथ शाहूचा पेशवा झाला त्यानें मोंगल बादशहापासून भीमेच्या दक्षिणेचा पंढरपुरापर्यंतचा मुलूख मराठ्यांच्या राज्यास जोडला व दक्षिणेंतील इतर मुलुखांत चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मिळविले. मराठ्यांची सत्ता पश्चिम भागांत दिवसेदिवस प्रबळ होत चालली. इंग्रजांनीं १७७२ सालीं भडोच घेतलें. १७४० सालीं बाळाजी बाजीराव पेशवा झाला. निजाम १७४८ मध्यें मरण पावला. पेशव्यांनीं त्याच्या एका मुलापासून तापी व गोदावरी यांमधील वर्हाडच्या पश्चिमेस असलेला मुलूख घेतला. लवकरच अहमदनगर पेशव्यांकडे आलें (१७६३- १७६६). या अवधींत पेशव्यांस विजापूर सुभा व मोंगलांनीं दक्षिणेंत जिंकून घेतलेला मुलूख मिळाला. १७६१ सालीं पानपतच्या पराभवाने मराठ्यांच्या राज्यास मोठा धक्का बसला. १७६४ सांत म्हैसूरांत हैदर प्रबळ झाला. निजामास आपला मराठ्यांकडे असलेला कांही मुलूख मिळविण्यास अवसर सांपडला (१७६१ ते १७७२). माधवराव पेशव्याच्या कारकीर्दीत पेशव्यांच्या राज्यास पुन्हां बळकटी आली. यावेळीं मराठ्यांचें उत्पन्न २८० लाख रु. होतें.
इंग्रजांची व पेशव्यांची पहिली सलामी १७६४ त झाली. इंग्रजांनीं राघोबाचा पक्ष स्वीकारला होता म्हणून त्यांचें पेशव्यांशीं युद्ध सुरू झालें. या युद्धाचा निकाल सालबाईच्या तहानें लागला. यामुळें इंग्रजांस साष्टी मिळाली व इंग्रजांनीं राघोबाचा पक्ष सोडला.
सन १७८० ते १८०३- या अवधींत मराठे आणि इंग्रज यांमध्यें युध्दें झालीं. या कालांत मराठ्यांची जूट फुटली. गायकवाड इंग्रजांच्या आश्रयास गेले, शिंदे उत्तर हिंदुस्थानांत स्वतंत्र झाले. १८०० मध्यें इंग्रजांनीं सुरत घेतलें. १७९० सालच्या म्हैसूरच्या युद्धांत पेशव्यांस वर्धा नदीच्या उत्तरेचा मुलुख मिळाला. १७९६ सालीं बाजीराव पेशवा झाला. बाजीरावाचें शिंदे आणि होळकर यांशीं वांकडें होतें. १८०२ सालीं पेशव्यानें वसईचा तह केला व या वेळेपासूनच पेशव्यांची इतिश्री होण्यास सुरुवात झाली. यावेळीं मुंबई इलाखा फारच लहान होता. यांत साष्टी, सुरत व बाणकोट हीं शहरें, मुंबई बेट व बंदर यांचा समावेश होत होता. मुंबई शहराचा इतिहास मुंबई या लेखांत (वि. १८) आलाच आहे. त्यावरून त्याची वाढ कसकशी होत गेली तें दिसून येईल. इ.स. १८०३ ते १८२७ या कालाच्या दरम्यान या इलाख्याच्या सरहद्दी आंखण्यांत आल्या. गुजराथ १८०५ सालीं मुंबई सरकाराकडे आला व त्याचा १८१८ सालीं विस्तार करण्यांत आला. हळूहळू पेशव्यांचें राज्य या इलाख्यांत सामील झाले. काठेवाड व महिकांठा या इलाख्यास जोडला (१८०७- १८२०). १८१८ सालीं बाजीरावानें पेशवाईचें उदक इंग्रजांच्या हातावर सोडलें. तेव्हां त्यांतून कांही भाग सातारच्या राजास व दोन परगणे कोल्हापूरकरांस दिले व बाकीच्या भागावर कमिशनर नेमण्यांत आला. माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टनच्या कारकीर्दीत ही व्यवस्था पुरी झाली. त्यानें नव्या शाळा घातल्या व सदर कोर्टे स्थापन करून न्यायखात्यास व्यवस्थित स्वरूप दिलें.
एलफिन्स्टनच्या कारकीर्दीनंतर सुधारणेची गति मंद झाली. संस्थानें खालसा करून त्यांचा समावेश इंग्रजी मुलुखांत करण्यात आला. एडन (१८३९), सिंध (१८४७) हे या इलाख्यांत सामील झाले. १८५३ साली पंचमहालचा मुलुख ठेक्यानें मुंबई सरकारनें आपल्याकडे घेतला. १८४७ सालीं जमीनमहसूल आकारण्याची तत्त्वें जाहीर करण्यांत आलीं. इनाम व जहागीर यांची चौकशी करण्यासाठीं कमिशन बसविण्यांत आलें. बराच मुलुख खालसा केल्यामुळें १८५७ सालचें बंड झाले. १८६२ सालीं अमेरिकेंत युद्ध सुरू झाल्यामुळें यूरोपांत हिंदुस्थानांतील कापसास फार मागणी आली व व्यापार्यांच्या हातांत पैसा फार खेळूं लागला. पुष्कळ कंपन्या अस्तित्वांत आल्या व पुढें त्या बुडाल्यामुळें लोकांचे फार नुकसान झालें. १८६८ त अवर्षण पडलें. १८७६, १८७७ व १८७८ या वर्षी दुष्काळ पडला. तेव्हां दुष्काळ टाळण्यासाठीं आगगाडीच्या रस्त्यांची वा जारीनें करण्यांत आलीं. पुढें सुमारें १० वर्षे सुबत्ता होती. पण १८९१ त अवर्षणास सुरुवात झाली. याच सुमारास संमतिवयाचा कायदा प्रसार करण्यांत आला. गोवधासंबंधानें हिंदु व मुसलमान यांमध्यें दंगे झाले. १८९५-९६ सालीं पुन्हां दुष्काळ पडला. १८९६ सालीं आगस्ट महिन्यांत मुंबईत प्लेग प्रथम सुरू झाला. प्लेगच्या उत्पत्तीसंबंधानें बरोबर माहिती नसल्यानें प्रथम अगदीं कडक असे प्रतिबंधक उपाय योजण्यांत आले. त्यासंबंधानें लोकांत तीव्र असंतोष माजला व पुण्यांत दोन खून झाले. यावेळीं उद्योगधंद्याची स्थिति बरीच खालावली.
अवशेष- प्रास्तरायुधयुगाचे अवशेष हिंदुस्थानच्या या भागांत नाहींत. फक्त कांहीं दगडांच्या उभारणी व अशोकाचे शिलालेख (ख्रिस्तपूर्व २५०) सांपडतात. भाजें (ख्रिस्तपूर्व २००), भेलसा (ख्रिस्तपूर्व १००), कारलें (ख्रिस्तपूर्व ५०), जुन्नर (इ.स. १००,) नाशिक (ख्रिस्तपूर्व १०० ते इ.स. २००), कान्हेरी (इ.स. १०० ते ५००) हीं प्राचीन काळची लेणीं आहेत.
हिंदु व जैन लोकांनींहि बौद्ध पद्धतीचीं लेणी कोरिलीं. हिंदूंची उत्तम लेणी निझामच्या राज्यांत व घारापुरी व बदामी येथें आढळतात. अगदीं प्राचीन तर्हेचीं हिंदु देवळें विजापूर जिल्ह्यांत आहेत. यांखेरीज हेमांडपंती म्हणून प्रसिद्ध असलेलीं देवळें द्रविड लोकांची असावींत असा संशोधकांचा तर्क आहे. हेमांडपंत हा देवगडच्या रामचंद्र राजाचा प्रधान होता (१२७१) गुजराथेंत जैन पद्धतीची देवळें आहेत. अंबराथ हें इंडो- आर्यन पद्धतीचें देऊळ आहे असें तज्ज्ञ म्हणतात. खंबायत येथे १३२५ सालची एक मशीद आहे. अहमदाबाद, महमुदाबाद आणि चंपानेर येथें हिंदु कारागिरांनीं धांदलेल्या मशिदी आहेत. १४ व्या शतकापासून पुढें हिंदूंनीं कलाकौशल्याची साक्ष पटणार्या अशा मोठ्या इमारती बांधिलेल्या दिसत नाहींत.
Comments
Post a Comment