तंजावर, जि ल्हा
विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
तंजावर, जि ल्हा.- मद्रास इलाख्याच्या दक्षिण भागांत किनार्याच्या काठचा एक जिल्हा. क्षे. फ. ३७१० चौ. मै. मर्यादा- उद्रारेस कोलेरून व तिच्या पलीकडे त्रिचनापल्ली व दक्षिण अर्काट जिल्हे; पश्चिमेस पुदुकोत्तई संस्थान व त्रिचनापल्ली जिल्हा; व दक्षिणेस मदुरा जिल्हा. किनार्यावर कारीकाल ही फ्रेंच वसाहत आहे.
स्वाभाविक वर्णन:- उत्तर व पूर्वेकडील प्रदेशांत कावेरी व तिच्या शाखांच्या योगानें शेतीला पाणी मिळण्याची सोय उत्तम असल्यामुळें, तेथें वस्ती सर्वांत दाट आहे. या भागापेक्षां दक्षिण भागाची उंची ५० फूट जास्त उंच असून प्रदेश रूक्ष आहे. या जिल्ह्यांत कोल्हा व खोंकड यांखेरीज इतर रानटी जनावरें आढळण्यांत येत नाहींत. जिल्ह्याची हवा एकंदरींत आरोग्यकारक आहे; सर्व जिल्ह्यांत सरासरी पाऊस वर्षास ४८ इंच होतो.
इतिहास:- दहाव्या शतकाच्या मध्यभागापर्यंत हा जिल्हा चोलांच्या राज्यांत मोडत होता. पहिल्या राजराजाच्या कारकीर्दींत त्या घराण्याची सत्ता कळसास पोहोंचली. त्यावेळीं त्यांच्या राज्यांत हल्लींचा सर्व मद्रास इलाखा, म्हैसूर, कुर्ग व सिलोनचा उत्तर भाग, एवढ्या प्रदेशाचा समावेश झाला होता. राजराजाच्या सैन्याचा सरंजाम व त्याची तयारी ही फार उच्च प्रकारची असून सैन्यांत घोडेस्वार, पायदळ, व गालंदाज यांच्या तुकड्या केलेल्या होत्या. त्यानें लागवडीखालच्या सर्व जमिनीची मोजणी करून तिचा सारा ठरविला व देवालयें आणि सार्वजनिक इमारती बांधून तंजावर सुशोभित केलें. त्याच्या कारकीर्दींत दिवाणी कारभाराचीहि व्यवस्था नीट लावण्यांत आली. प्रत्येक गांवांत अगर ग्रामसमूहांत स्थानिक अधिकार्यांच्या देखरेखीखालीं एक महासभा असून, गांवासंबंधीं सर्व प्रकारच्या बाबतींत तिला पूर्ण बहुतेक अधिकार असत. कांहीं ग्रामसमूह मिळून एक जिल्हा व कांहीं जिल्हे मिळून एक प्रांत होत असे. चोलांच्या राज्यांत असे सहा प्रांत होते. राजराजानें स्थापन केलेलें राज्य त्याच्या मृत्यूनंतर पुष्कळ काळपर्यंत कायम राहिलें. राजराज चोळ व त्याच्या मागून गादीवर बसलेले राजे, त्याच्याप्रमाणेंच शूर व राज्यकारभारदक्ष होते. कावेरी व कोलेरून नद्यांना विभक्त करणारा मोठा बंधारा त्यांनींच बांधला.
तेराव्या शतकांत चोलांच्या इतर मुलुखाबरोबर तंजावरहि द्वारसमुद्राच्या होयसळ बलजळांच्या आणि मदुरा येथील पांड्यांच्या अंमलाखालीं गेलें. चवदाव्या शतकाच्या अखेरीस उदयोन्मुख विजयनगरच्या राज्यांत सामील होण्यापूर्वीं, हा जिल्हा सर्व दक्षिणेबरोबर मलिक काफूरच्या मागून आलेल्या मुसुलमानांच्या स्वार्यांनां बळी पडला असावा. सोळाव्या शतकांत विजयानगरच्या एका सेनापतीनें आपलें स्वातंत्र्य जाहीर केलें व त्याच्या नंतरच्या पुरूषानें सतराव्या शतकाच्या प्रारंभीच्या वर्षांत तंजावर येथें नायक घराणें स्थापन केलें. ह्या घराण्यांतील राजांनीं जिल्ह्यांतील बहुतेक किल्ले व वैष्णव मंदिरें बांधिली आहेत. नायक घराण्यांतील शेवटल्या राजाला मदुरा नायक चोक्कनाथ यानें स. १६६२ त वेढा दिला; त्यावेळीं बचाव करणें अशक्य आहे असें पाहून त्यानें राजवाडा व झनाना उडवून दिला, व आपण आपल्या पुत्रांसह वेढा देणार्या लोकांवर तुटून पडून लढतां लढतां मरण पावला. तथापि त्याचा एक लहान मुलगा बचावला; मुलाच्या अनुयायांनीं विजापूरच्या मुसुलमान राजाची मदत मागितल्यावरून विजापूरहून शिवाजीचा सावत्र भाऊ व्यंकोजी यास तंजावरवर पाठविण्यांत आलें. व्यंकोजीनें प्रथम बाल नायकाला गादीवर बसविलें. परंतु पुढें लवकरच ती गादी आपण स्वत:बळकावून तेथें मराठी घराण्याची त्यानें स्थापना केली. अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत या घराण्याची सत्ता कायम होती. पहिलीं सुमारें सत्तर वर्षें मात्र मुसुलमानांशीं त्यांचें वर्तन सलोख्याचें असून त्यांनां ते खंडणी देत असत.
स. १७४९ त येथील गादीसंबंधीं तंटा चालू असतां इंग्रजांनीं एक पक्ष स्वीकारून देवी कोट्टईवर हल्ला केला व अखेर तें गांव घेतलें. कर्नाटकच्या युद्धांत राजा इंग्रज व महंमदअल्ली यांच्या बाजूला मिळाला होता परंतु एकंदरींत त्यानें युद्धांत फारसा भाग घेतला नाहीं. पुढें १७७३ सालीं राजा हैदरअल्ली व मराठे यांजबरोबर कांहीं मसलत करीत आहे असें वाटल्यावरून इंग्रजांनीं तंजावर आपल्या ताब्यांत घेतलें. परंतु १७७६ त कंपनीशीं झालेल्या तहान्वयें तें परत करण्यांत आले. स. १७९९ त सरफोजी राजाने आपला सर्व मुलुख कंपनीच्या हवालीं करून आपण पेन्शन घेतलें. १८५५ सालीं सरफोजीचा मुलगा शिवाजी हा निपुत्रिक वारल्यामुळे तंजावर गाव व किल्लाहि ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. या जिल्ह्यांत पुराणवस्तुसंशोधकांच्या द्दष्टीनें महत्त्वाची ठिकाणें म्हणजे तेथील धार्मिक इमारती होत. सर्व देवालयांत तंजावर येथील पहिल्या राजराजानें बांधलेलें मंदिर महत्त्वाचें आहे.
लोकसंख्या:- सर्व इलाख्यांत ह्या जिल्ह्याची लोकवस्ती फार दाट असून, घनतेचें प्रमाण द. चौ. मैलास ६०५ लोक असें आहे. जिल्ह्यांत लहान मोठी २५२९ गांवें आहेत. एकंदर लो. सं. (१९२१) २३२६२६५. पैकीं शें. ९१ हिंदू, शें. ५ मुसुलमान व शें. ४ ख्रिस्ती आहेत. जिल्ह्यांतील बायकांचें पुरूषांशीं प्रमाण ११:१० असें आहे. याचें कारण येथून ब्रह्मदेश, सीलोन, वगैरे ठिकाणीं पुष्कळ लोक जातात व बरोबर स्त्रिया नेत नाहींत हें होय. जिल्ह्यांत सर्वत्र तामीळ भाषा चालते. केवळ शेतीवर उदरनिर्वाह करणारा वर्ग या जिल्ह्यांत इतर ठिकाणच्या मानानें कमी आहे; याचें कारण पुष्कळ लोक व्यापार, सोनारकाम वगैरे किरकोळ धंद्यावर चरितार्थ चालवितात.
शेती:- या जिल्ह्यांत मुख्यत: रयतवारी पद्धत चालू असून काहीं जमीनदारी व इनामी जमिनीहि आहेत. कावेरीच्या खोर्यांत मुख्यत: भाताची लागवड होते, व इतर भागात वरगू नांवाचें धान्य सर्वांत ज्यास्त पिकतें. शेतीकरितां लागणार्या पाण्याचा बहुतेक पुरवठा कावेरी व तिच्या शाखांपासून होतो. जिल्ह्याच्या उत्तर मर्यादेवरून वाहणारी कोलेरून ही कावेरीची शाखा असून तिचा प्रवाह मुख्य पात्रापेक्षां सखल जागेवरून वहात असल्यामुळें कावेरीचें बरेंच पाणी कोलेंरूनमधून जात असे. याकरितां दोन मोठे बांध किंवा धरणें घालून कावेरीच्या पाण्याचा उपयोग तंजावर जिल्ह्यांतील शेतीकरितां करून घेण्यांत आलेला आहे. या जिल्ह्यांत महत्वाचीं जंगलें मुळींच नाहींत. वल्लम येथें गार सांपडते व जिल्ह्याच्या नैर्ॠत्य भागांत लॅटराइट व चुनखडी हीं मुबलक आहेत. तंजावर तालुक्यांत पिंवळी काव व नागोरजवळ शिरगोळा हे खनिज सांपडतात.
व्यापार व दळणवळण:- विणकाम व धातुकाम हे येथील मुख्य उद्योगधंदे आहेत. एके काळीं तंजावरचें रेशमी कापड प्रसिद्ध असे; परंतु कृत्रिम रंग निघाल्यापासून आणि स्वस्त विलायती माल मिळूं लागल्यापासून हा धंदा बहुतेक बसला आहे. कोर्नाद व अय्यंमपेटीई हीं गांवें रेशमी कापड आणि गालीचे यांकरितां प्रसिद्ध होतीं. तंजावर व कुंभकोणम येथें अद्यापहि कशिद्याचें व जरीचें काम चांगलें होतें. दक्षिणेंत तंजावरच्या तोडीचें धातुकाम मदुरेखेरीज इतर कोठेंहि होत नाहीं. मदुरेंतील कारागीर फक्त पितळेचें काम करितात; परंतु तंजावरमध्ये पितळ, तांबे व रूपें या तिन्हहि धातूंचा उपयोग केला जातो. या धातूंच्या देवाच्या मूर्ती व इतर नक्षीदार जिन्नस तयार केले जातात. तंजावर शहर, कुंभकोणम व मन्नारगुडी ही धातुकामाची मुख्य ठिकाणें होत. इतर किरकोळ धंद्यांपैकीं पिसानत्तूरचें काशाचें काम आणि वाद्यें व खेळणीं तयार करण्याच्या कारखान्यांचा उल्लेख करणें जरूर आहे. कलाकौशल्याच्या कामाखेरीज, केवळ कारखाने असे तंजावरमध्यें फारसे नाहींत.
तंजावर जिल्हा समुद्रकाठीं असून त्यातून रेल्वेचे फांटे पुष्कळ गेलेले असल्यामुळें तो व्यापारद्दष्ट्या फार सोयीचा आहे. त्यात एकंदर १५ बंदरें असून नेगापट्टम हें सर्वांत महत्त्वाचें आहे. त्रांक्किबार, नागोर, (नगावर ?) मुत्तुपेट, अदिरांपट्टम, व अम्मपट्टम हीं बंदरेहि साधारण बरीं आहेत. नेनापट्टम खेरीज, तंजावर, कुंभकोणम, मायावरम, व मन्नागुडी हीं दुसरीं व्यापाराचीं ठिकाणें आहेत. खुष्कीनें व जलमार्गानें होणारा बहुतेक व्यापार चेट्टी व मुसुलमान लोकांच्या हातीं आहे.
तांदूळ, विड्याची पाने, भुईमुगाच्या शेंगा, धांतूचीं भांडीं व कापड हे खुष्कीमार्गानें जाणारे मुख्य निर्गत जिन्नस आहेत. तुतिकोरीनहून मीठ; म्हैसूर व तिनेवल्लीहून सरकी, मद्रासहून राकेल; पश्चिम किनार्यावरून चिंच व इमारती लाकूड; आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून तूप, मिरची, डाळी, वगैरे जिन्नस येतात. तुतिकोरीन बंदर झाल्यापासून या जिल्ह्याचा समुद्रावरून होणारा व्यापार कमी झाला आहे.
साक्षरतेच्या बाबतींत तंजावर जिल्ह्याचा नंबर मद्रास शहराच्या खालोखाल लागत असून, शें. २०.३ पुरूषांनां व शें. ०.९ स्त्रियांनां लिहितां वाचतां येतें. १९०४ सालीं जिल्ह्यांत ११८२ प्राथमिक शाळा, ७८ दुय्यम शाळा, ७ विशिष्ट शाळा, ३ शिक्षकांच्या शाळा, व ३ आर्टस कॉलेजें होतीं. या जिल्ह्यांत स्थानिक बोर्डें व म्युनिसिपालीट्या यांनीं चालविलेलीं १६ रूग्णालयें व २२ दवाखाने आहेत. तंजावर शहरच्या रूग्णालयाला एक मेडिकल स्कूल जोडलेले आहे.
तालुका.- मद्रास इलाख्यांत तंजावर जिल्ह्याचा पश्चिम तालुका व पोटविभाग. क्षे. फ. ६८९ चौ. मै. आहे. लो. सं. (१९०१) ४०७०३९. यांत ३६२ खेडीं व तंजावर शहर (जिल्ह्याचें आणि तालुक्याचें ठिकाण), तिरूवाडी हें पवित्र गांव, कलेक्टरचें राहण्याचें ठिकाण वल्लम, व गालिचाकरितां प्रसिद्ध असलेलें अय्यंपेट्टई अशीं चार मोठीं गांवें आहेत. या तालुक्यांत कल्लण नांवाचे चोर्या करणारे लोक फार आहेत. यांत तांदूळ, कंबू, रगी, भुईमूग, तांबडा हरभरा, वगैरे पिकें होतात.
शहर.- मद्रास इलाख्यांत याच नांवाच्या जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें शहर साऊथ इंडियन रेलवेच्या मुख्य फांट्यावर मद्रासपासून २१६ मैल व तुतिकोरीनपासून २२६ मैल अंतरावर आहे. लो. सं. (१९२१) ५९९१३. तंजावर हें मद्रास इलाख्यांतील आठवें मोठें शहर आहे. तंजावर हें अनुक्रमानें चोल, नायक व मराठे लोकांचें राजधानीचें ठिकाण होतें. या शहराला, १७४९ सालीं फ्रेंच व चंदांसाहेब यांनीं आणि १७५८ सालीं लालीच्या हाताखालीं फ्रेंचांनीं वेढा दिला होता; परंतु ते वेढे निष्फळ झाले. स. १७७३ त कर्नल जोसेफ स्मिथ यानें हें शहर काबीज केलें व स. १७७६ त तें पुन्हां महाराजाकडे देण्यांत आलें. स. १७९९ त तंजावरचा राजा सरभोजी यानें आपला सर्व मुलूख इंग्रजांनां दिला त्यावेळीं तंजावर शहर मात्र आपल्या ताब्यांत ठेविलें होतें; त्याचा मुलगा १८५५ सालीं निपुत्रिक वारल्यावर तेहि इंग्रजांच्या राज्यांत सामील झालें. राजाच्या चार राण्या व कुटुंबांतील इतर मंडळी, किल्ल्याच्या मध्याभागीं असलेल्या राजवाड्यांत रहात असत (१९०८). राजवाड्यांत मराठे व नायक यांचे दरबारी दिवाणखाने, शस्त्रागार व निरनिराळ्या भाषांतील २२००० पुस्तकें असलेलें वाचनालय हीं आहेत.
किल्ल्याचा तट पाडून टाकलेला आहे. किल्ल्याच्या आतल्या बाजूला शिवगंगा नावाचा लहानसा किल्ला असून त्यांत शिवगंगा टाकें, व बृहदीश्वर स्वामीचें प्रख्यात देवालय आहे. भिंतीवरील लेखावरून हें देऊळ ११ च्या शतकांत, चोल राजा पहिला राजराज यानें बांधलें असें समजतें. एतद्देशीय राजांच्या अमदानींत तंजावर हें कलांचें माहेरघर समजलें जात असे. अद्यापहि येथें कांहीं कुशल कारागीर आहेत. तंजावरसारखें धातुकाम व वाद्यें या इलाख्यांत बहुधा दुसर्या कोठेंहि होत नाहींत; व येथील रेशमी विणकाम, फीत, कशिद्याचें व जवाहिरी काम आणि कृत्रिम हार फा प्रसिद्ध आहेत.
तंजावर हें १८६० सालीं जिल्ह्याचें मुख्य ठिकाण झालें; व तेव्हांपासून येथें सर्व जिल्हा कामगार आहेत. उत्तरेकडील करतंत्तान नांवाच्या उपांत भागांत ब्राह्मणवसति असून आग्नेयीकडील मानंबुचावाडींत यूरोपियन लोक रहातात. येथें ख्रिस्ती लोकांच्या निरनिराळ्या धर्मपंथांच्या मिशनरी मंडळ्या आणि एस. पी. झी. मिशन सोसायटीचें कॉलेज, खासगी लोकांनीं चालविलेलें हायस्कूल, शिक्षकांकरितां ट्रेनिंग स्कूल व टेकनिकल इन्स्टिट्यूट या शिक्षणसंस्था आहेत. येथील म्युनिसिपालिटी १८६६ सालीं स्थापन झाली. १९०३-०४ सालीं तिचें उत्पन्न १०३००० रू. होतें. वेन्नर नदीच्या पात्रांतील विहिरीचें पाणी पंपानें वर काढून शहराला दिलेलें आहे. किल्ल्याच्या भागांतील मैलमोर्यांचें काम १८४० सालीं राजाच्या वेळीं झालें. सार्वजनिक वर्गण्या गोळा करून १८८० सालीं स्थापन झालेल्या रूग्णालयाला मेडिकल स्कूल जोडलेलें आहे.
Comments
Post a Comment