बिथिनिया - हा प्राचीन जिल्हा आशियामायनरच्या वायव्य भागांत होता.

विभाग आठरावा : बडोदें ते मूर

बिथिनिया - हा प्राचीन जिल्हा आशियामायनरच्या वायव्य भागांत होता. याच्या पूर्वेस पॅफ्लागोनिया, पश्चिमस मायसिया, दक्षिणेस फ्रिजिया, एपिक्टेटस, गॅलेशिया व उत्तरेस काळा समुद्र. यांत पर्वत, जंगलें, त्याचप्रमाणें खोरी व समुद्र किना-याजवळील सुपीक प्रदेश आहे. मायसियन' आलिंपस नांवाची प्रसिध्द पर्वतांची ओळ यांत आहे. इस्मीद (ऍस्टेकस) व मुदानिया अथवा गेमलिक (सियस), हीं आखातें आहेत.

येथील नद्या, सँगेरियस (आधुनिक सॅकारिया), -हिडेसस, बिलेयस (फिलियस) व पार्थेनियस ह्या आहेत. येथील जंगलांत इमारतीचें लांकूड विपूल आहे, दगडी कोळसाहि सांपडतो. सर्व त-हेची फळे होतात. रेशमासाठीं तुतीच्या झाडांची लागवड केलेली आहे. रेशमी कपडा ब्रुसा येथें तयार होतो.

येथील लोक थ्रेसमधून आले असावे. बिथिनिया हा प्रथम लिडियन राज्याचा भाग होता, नंतर त्याचा इराणी साम्राज्यांत समावेश झाला (ख्रिस्तपूर्व ५४६). शिकंदरच्या स्वारीच्या अगोदर बिथिनिया स्वतंत्र झाला. व त्यानें आपलें स्वातंत्र्य दोन राजांच्या कारकीर्दीत राखलें. पहिल्या निकोमीडिसनें प्रथम राजा ही पदवी घेतली व निकोमीडिया शहर वसविलें (ख्रिस्तपूर्व २७८ २५०). यानंतर पहिला व दुसरा प्रुसिअस निकोमीडिस (ख्रि. पू. १४९-९१) हे राजे झाले. तिस-या निकोमीडिसनें रोमन लोकांच्या मदतीनें पाटसच्या मिथ्रिडाटीझविरूध्द टिकाव धरला. परंतु रोमन लोकांच्या नांवें मृत्युपत्रांत राज्य लिहून ठेविलें. त्यामुळें बिथिनिया हा रोमन प्रांत झाला. बायझन्टाईन साम्राज्यांत सँगेरियसमुळें दोन भाग होऊन तिच्या पश्चिमेकडील भागाला बिथिनिया हे नांव मिळालें.


राजधानीबद्दल स्पर्धा करणारीं निकोमीडिया व निकेई हीं दोन शहरें होती. सियस, कालसिडान व हेराक्लिया पांटीका येथें ग्रीक वसाहती होत्या. सांप्रत इस्मीद (निकोमीडिया) व स्कुटारी हीं शहरें प्रसिध्द आहेत.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे