स्वात संस्थान- वायव्य सरहद्दीवरील प्रांतांतील दीर, स्वात व चित्रळ एजन्सीपैकीं एक भाग

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
              
स्वात संस्थान- वायव्य सरहद्दीवरील प्रांतांतील दीर, स्वात व चित्रळ एजन्सीपैकीं एक भाग. हा भाग म्हणजे स्वात नदीचें खोरें होय. या संस्थानचें स्वात कोहिस्तान (डोंगराळ प्रदेश) व स्वात खुद्द असे दोन भाग आहेत. स्वात खुद्द मध्ये वर (वरचें) व कुझ (खालचें) स्वात असे पोटभाग आहेत. स्वातचें क्षेत्रफळ दीर एवढेंच आहे; परंतु खोऱ्याची लांबी १३० मैलांपेक्षां जास्त नसून रुंदी सरासरी १२० मैल आहे. स्वात व पंजकोर नद्यांच्या संगमाजवळ खोऱ्याची उंची समुद्रसपाटीच्या वर दोन हजार फूट आहे. ही उंची झपाट्यानें पुढें वाढत जान उत्तरेकडील डोंगरांच्या शिखरांची उंची समुद्रसपाटीपासून १५ ते २२ हजार फूट आहे. खालच्या खोऱ्यांतील हवा मलेरियस व रोगट आहे. दीर, स्वात, बाजौर व उतमनखेल यांचा इतिहास एकमेकांशीं इतका निगडित झालेला आहे कीं, तो निरनिराळा लिहिणें अशक्य होय. या देशासंबंधीचा पहिला उल्लेख अरियन यानें केला असून, कुनर, बाजौर, स्वात आणि बुनेर यांमधून ख्रिस्तपूर्व ३२६ या वर्षी अलेक्झांडर यानें आपलें सैन्य नेलें  होतें असें ती म्हणतो. पुढें २० वर्षांनंतर हा सर्व मुलूख सेल्युकस यानें चंद्रगुप्ताला परत दिला. बष्कर व स्वात कोहिस्तानमध्यें हल्लीं रहाणाऱ्या गुजर, तोरवाल, गढवाल वगैरे लोकांचे बौद्धधर्मी पूर्वज १५ व्या शतकापर्यंत तेथेंच रहात होते. नंतर उतमनखेलच्या मदतीनें युसुफझै व खखै वंशांच्या दुसऱ्या पठाण टोळ्यांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या; व सोळाव्या शतकाच्या सुमारास बुनेर, खालचें स्वात व पंजखोर खोरें युसूफझै लोकांच्या ताब्यांत गेलें. पठाण टोळ्यांच्या आगमनानंतर सर्व भागांत मुसुलमानी धर्म सुरू झाला. या सुमारास, बाबरानें मोठ्या चातुर्यानें युसुफझै टोळीचा मुख्य मलिकशह मनसूर याच्या मुलीशीं विवाह करून त्यांच्या मुलुखांत आपली सत्ता प्रस्थापिक केली. वरच्या स्वातमध्यें राहणाऱ्या मूलच्या स्वाती लोकांनींहि बाबरात शरण जाऊन आपलें संरक्षण करण्याविषयीं बाबरास विनंति केली. व ती त्यानें मान्य केली. परंतु हुमायूनच्या  कारकीर्दीत युसूफझै लोकांनीं आपली प्रगति चालू ठेवून शेरिंगळ, दीचा लांहीं भाग व एैनपर्यंत वचें स्वात एवढा मुलुक काबीज केला. त्यांनीं हुमायूनची सत्ता झुगारून दिली व १५८४ त अकरहि त्यांनां पूर्णपणें आपल्या ताब्यांत आणूं शकला नाहीं. पुढें त्यांच्यामध्यें धार्मिक बाबीसंबंधानें भांडणें सुरू झाल्यामुळें, त्यांनां ताब्यांत आणण्याकरितां काबूलच्या सुभेदारानें, झैनखान कोकल्ताश याला पाठवून सर्व प्रदेश जिंकून घेतला. तथापि, १६५८ त, औरंगझेब गादीवर आला त्यावेळी येथील टोळीनें कर देण्याचें नाकारून आपलें स्वातंत्र्य जाहीर केलें. नादीरशहाच्या वेळेपर्यंत त्यांचें स्वातंत्र्य कायम होतें; परंतु नादिरशहाच्या मागून अहमदशहा दुराणी व तिमूरशहा (तैमूर?) यांनीं हा प्रदेश आपल्या ताब्यांत ठेविला होता. त्यानंतर आलेल्या राजांनीहि आपला अंमल अजीबात सोडला होता असें नाहीं.  १८२३ सालीं अझीमखानानें शीख लोकांवर हल्ला केला त्यावेळीं युसूफझ टोळीनें त्याला पुष्कळ मदत केली; परंतु त्यांचा पराभव होऊन रणजितसिंग पेशावरमध्यें शिरला; परंतु त्यानें उत्तरेकडील डोंगराळ मुलुखांत जाण्याचा प्रयत्न केला नाहीं. १८४९ त पेशावरचें खोरें ब्रिटिशांच्या ताब्यांत आलें. अखुंद हा १८७७ त मरण पावल्यावर त्याच्या गादीसंबंधीं त्याचा मुलगा व दीरचा खान यांच्यामध्यें तंटा उत्पन्न होऊन बाजौरमध्यें नवगैपर्यंत सर्व प्रदेशांत अस्वस्थता माजली. त्यावेळच्या भांडणांत बाजौरच्या घराण्यांतील उमराखान नांवाचा पुरुष प्रामुख्यानें पुढें आला. त्यानें अखुंदचा मुलगा मियानगुल याशीं दोस्ती करून दीरच्या खानाचा अर्धा मुलुख काबीज गेला. परंतु पुढें त्याचें व मियानगुलचें न पटून दीर, नवगै, स्वात, उतमनखेल, सलरझै व मामूद येथील लोक उम्राखानाच्या विरुद्ध जमा झाले; परंतु उम्राखानानें त्यांचा पराभव करून (१८९०) दीरचा सर्व मुलुख आपल्या ताब्यांत घेतला. १८९४त उम्राखान व ब्रिटिश यांच्यामध्यें वितुष्ट आलें; व ब्रिटिशांकडून पराभव पावल्यामुळें त्याला १८९६ त काबुलास पळून जाणें भाग पडलें. दीरच्या खानानें लगेच आपली सत्ता परत मिळवून इंग्रजांशीं तह केला; चित्रळहि थोड्याच दिवसांत इंग्रजांच्या हातीं गेलें. १८९७ त स्वातचा मुल्ला मस्तान यानें कांहीं लोक जमवून चकदरा व मलकंद या ब्रिटिश ठाण्यांवर हल्ले केले; परंतु पुष्कळ प्रयासानंतर ते परतविण्यांत आले. नौशहर पासून मलकंद घाटाच्या पायथ्याशीं दरगैपर्यंत रेल्वे रस्ता झालेला आहे. मधून मधून टोळ्यांशीं चकमकी होतात; मागल पावशतकांत कांहीं एक महत्त्वाची गोष्ट घडलेली नाहीं. हल्लीं, खुद्द स्वात मध्यें, युसुफझै पठाणांच्या जातींपैकी अकझै नांवाच्या शाखेचे लोक राहतात (सुमारें १५००००) व कोहिस्तानमध्ये तोरवाल व गढवाल लोकांची वस्ती (२००००) आहे. कोहिस्तान खेरीज इतर ठिकाणीं शुद्ध युसूफझै पुश्तु भाषा बोलतात. येथील लोक सुनी पंथाचे मुसुलमान आहेत. सैदू येथें असलेलें अखदाचें थडगें, उत्तर हिंदुस्थानांतील स्थळांपैकीं एक महत्त्वाचें आहे.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे