नंदुरबार, ता लु का.- मुंबई. पश्चिम खानदेशांतील एक तालुका.
विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ
नंदुरबार, ता लु का.- मुंबई. पश्चिम खानदेशांतील एक तालुका. उत्तर अक्षांश २१० ते २१० ३२’ व पूर्व रेखांश ७३० ३५’ ते ७४० ३१’. क्षेत्रफळ ९९२ चौरस मैल. यांत नंदुरबार हें एकच व मुख्य शहर व २७५ खेडीं आहेत. लोकसंख्या (१९११) ८३२७२. पश्चिम भागांत सह्याद्रीच्या कांहीं टेंकड्या आहेत पूर्वेकडील भाग उजाड आहे. हवा थंड असून सरासरी पाऊस २५ इंच पडतो. पाणी कमी असून फक्त तापी व शिवा याच नद्यांनां १२ महिनें पाणी असतें. पाटाचेंहि पाणी असून, थोड्या फार बागाइती जमिनी आहेत. जंगल बरेंच असून त्यामुळें वाघाचा उपद्रव फार होतो.
गां व.- हा गांव खानदेशांतील फार जुन्या गांवांपैकीं एक असून धुळ्याच्या वायव्येस ३२ मैलांवर आहे. नंदुरबार तालुक्याचें हें ठाणें आहे. याचा नंदिगड या नांवानें कान्हेरि येथील लेण्यांतील शिलालेखांत उल्लेख आहे. हें गांव नंद गवळी यानें वसविलें असून मुसुलमानांच्या स्वारीपर्यंत तें त्याच्या वंशजांच्या ताब्यांत होतें असें म्हणतात. इन्न बतूता यानें आपल्या प्रवासवृत्तांत नंदुरबारचा उल्लेख केला आहे. खानदेशचा पहिला फरुकि राजा मलिकराज यांने सुलतानपूर व नंदुरबार हीं १७३० सालीं घेतलीं; परंतु सुलतान मुजफर गुजराथी ह्याच्या स्वारीमुळें मलिकराजास थाळनेराकडे परत जावें लागलें. इ. स. १५३६ मध्यें महंमुदशहा(तिसरा) हा गुजराथचा राजा झाल्यावर त्यानें अशीरगडावर कैदेंत असतांना कबूल केल्याप्रमाणें सुलतानपूर व नंदुरबार हीं ठाणीं मुबारकखान फरुकि यांस दिलीं. मध्यंतरी गुजराथच्या चेंगीझखानानें हीं पुन्हां घेतलीं होतीं परंतु त्यास लवकरच तीं सोडावीं लागली. अकबराच्या कारकीर्दीत हें सरकार (जिल्ह्या)चें ठाणें असून त्याचा वसूल पांच कोटी दाम असे. येथें टरबुजें व द्राक्षें होत असत. टॅव्हर्निअर यानेंहि असेंच म्हटलें असून हें फार भरभराटींत होतें असें म्हटलें आहे. सन १६६६ मध्यें येथें इंग्रजांनीं एक वखार घातली व ती चांगली चालल्यामुळें त्यांनीं अहमदाबादचा कारखाना (१६७० सालीं) येथें आणला व त्यांत तयार झालेला माल इंग्लंडांत पाठविण्यांत आला एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या कालांत याचा नाश झाला. इ. स. १८१८ मध्यें हें गांव इंग्रजांच्या ताब्यांत आलें तेव्हां अर्धवट ओसाड होतें. येथून कापूस, जंवस, गहूं, रोशेल तेल वगैरे जिन्नस बाहेर जातात.
येथें कचेरी, कोर्ट, शाळा, पोष्ट व म्युनिसिपालिटी आहे. येथील जुना किल्ला मोडकळीस आलेला आहे. त्यांत दोन विहिरी आहेत. एका जुन्या मशिदीचे अवशेष असून तिच्या एका मनोऱ्यावर एक फारशी शिलालेख आहे. उत्तरेच्या बाजूस जुम्मामशीद असून ती एक देऊळ पाडून बांधली असें म्हणतात. याखेरीज दोन मशीदी आहेत. गांवाबाहेर ईशान्येच्या बाजूस एक देऊळ व एक मशीद असून तीवर, ती १५८३ (९९१ हिजरी) सालीं बांधल्याबद्दल शिलालेख आहे. रनाळा सडकेवर अवलगझनी नांवाची मशीद आहे. याखेरीज नदीवर एक जुनी मशीद असून तीमधील दोन थडग्यांवर फारशी लेख आहेत.
येथें एक रामाचें व एक विठ्ठलाचें देऊळ असून ४।५ तलाव आहेत. येथील सरदेसाई यांचें बरेंच जुनें घर आहे. लो. सं. दहा हजार आहे. येथें ताप्ती-व्हॅली रेल्वे झाल्यापासून व्यापार वाढत असून येथील स्टेशन महत्त्वाचें आहे. सुरत-मुंबईशीं व्यापार चालतो. कापूस पिंजण्याचे व गठ्ठे बांधण्याचे ४-५ कारखाने आहेत. [लासेन, यूल. २; फेरिस्ता ४; ऐने-इ-अकबरी २; अँडर्सन- इंग्लिश इन वेस्टर्न इंडिया.]
Comments
Post a Comment