संयुक्तप्रांत

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ६ वें 
हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन. 

संयुक्तप्रांत, इतिहास - वैदिक सूक्तांवरून असें अनुमान निघतें कीं आर्याची वस्ती २००० वर्षापूर्वी यमुना नदीच्या पश्चिमेस होती. त्यानंतर त्यांनीं तेथून आपला तळ हलविला. महाभारत व रामायणावरून जी ऐतिहासिक माहिती मिळते, तीवरून आर्यांनीं प्रथमतः आपलें राज्य मिरत येथें व नंतर अयोध्येस स्थापिलें असें दिसतें. मिरत भागांत रहात असलेले हस्तिनापूरचे कौरव व पांडव यांच्यांतील भारतीयुद्धाचें वगैरे वर्णन महाभारतांत आहे. रामायण-महाभारताचा काल निश्चित ठरला नाहीं. तथापि या प्राचीन ग्रंथांवरून असें दिसतें कीं आर्यांनीं निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळ्या मार्गांनीं हिंदुस्थानांत वसति केली. हिमालयाच्या पायथ्याशीं पोंचल्यानंतर बिहारकडे ते वळले व मगध देश त्यांनीं व्यापून टाकिला. यापुढचा महत्त्वाचा ऐतिहासिक भाग म्हणजे बौद्ध काल होय. बुद्धानें आपल्या आयुष्याचा बराच काल पूर्वेकडील जिल्ह्यांत घालविला ही गोष्ट त्या काळचे शिलालेख, स्तूप, विहार इत्यादिकांवरून सिद्ध होते.

शिकंदर बादशहाच्या वेळीं इकडे चंद्रगुप्‍त राजा राज्य करीत असून त्याच्या राज्याचा विस्तार हिंदुकुश पर्वतापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होता. राजधानीचें ठिकाण पाठणा येथें होतें. चंद्रगुप्ताचा नातु अशोक याचे संयुक्तप्रांतांत शिलालेख प्रसिद्धच आहेत (अलाहाबाद, बनारस, डेहराडून येथील कालसी).

मौर्यानंतर चार घराणी उदयाला आलीं ती शूरसेन (सांप्रत मथुरा), उत्तर पांचाल (रोहिलखंड), कोसल (अयोध्या) व कौशांबी (अलाहाबाद) हीं होत. चौथ्या शतकांत मगध (बिहारप्रांत) देशांत चंद्रगुप्‍त राजा राज्य करीत असून त्याच्या राज्याचा विस्तार सतलज नदीपासून बंगाल व अयोध्येपासून मध्य हिंदुस्थानापर्यंत होता. ५ व्या शतकांत गुप्‍त राज्य संपलें. त्यानंतर देशांत बेबंदशाही माजली. सातव्या शतकांत कांहीसें स्थीरस्थावर झालें. त्यावेळीं शिलादित्य माळव्यांत राज्य करीत होता व हर्षवर्धन कनोज येथें होता. ९८८ सालीं गझनीच्या सबक्तगीननें पंजाबमधील तोमर राजांचा पराभव करून तो कनोजपर्यंत आला. १०१८ त महमंद गझनीनें यमुना नदी उतरून बुलंद शहर घेतलें. मथुरा शहराची भरभराट त्यावेळीं अतिशय होती. गझनीनंतर घोरी इकडे स्वार्‍या करूं लागले. सन ११९१ मध्यें महंमद घोरीनें लागलीच पुढील वर्षी चांगली तयारी करून पृथ्वीराजाचा पराभव कला व त्याचें राज्य घेतलें. यापुढें मुसुलमानांच्या गुलाम घराण्यानंतर खिलजी राजे झाले. खिलजींच्या सत्तेखालीं रयत फार त्रस्त झाली होती. सन १३४४ त मोठा दुष्काळ पडला. त्या योगानें दुआब भाग बेचिराख झाला. १३९८ त तैमूरलंगाची स्वारी आली. त्यानें दिल्ली सर करून मिरतपर्यंत प्रवेश केला.

सोळाव्या शतकाच्या आरंभीं दिल्ली राजधानी मोडून आग्रर्यास ठाणें आलें. १५२६ त बाबरनें इब्राहीमचा पराभव पानिपत येथें करून राज्य घेतलें. अकबरानें आग्रा व अलाहाबाद येथील प्रचंड किल्ले बांधले. मोंगलांची अमदानी मागें इतिहासांत वर्णन केलीच आहे. आग्रा येथें अकबराचें थडगें जहांगीरनें बांधलें. शहाजहाननें आपल्या राणीच्या स्मरणार्थ आग्रयास ताजमहाल नांवाची अत्यंत सुंदर व सुबक अशी इमारत यमुना नदीच्या कांठावर बांधली. जगांत अशी सुंदर दुसरी इमारत नाहीं. शहाजहानच्या चौघा मुलांत गादीबद्दल ज्या लढाया झाल्या त्या त्या प्रांतानें पाहिल्या आहेत.

औरंगझेब १७०७ मध्यें वारला व त्याजबरोबर या भागांतील व हिंदुस्थानांतील इतर सर्व ठिकाणची सत्ताहि संपुष्टात आली. औरंगझेबाच्या मरणापूर्वीच जाट लोकांनीं आग्रयास शह देण्याचा उपक्रम आरंभिला होता आणि उत्तरोत्तर ते संयुक्त प्रांतांत घुसूं लागले. १७०६ सालीं शीख लोकांनीं अनत्याचारी धर्मदीक्षा टाकून तलवार धारण केली व संयुक्त प्रांतावर स्वारी केली. या वेळीं मराठ्यांनीं विंध्य पर्वताच्या उत्तरेस आपला मोर्चा फिरविला. फर्रुकशाह बादशहानें त्यांनां दिल्लीहून आमंत्रण पाठविलेंच होतें. मराठ्यांची जरब या वेळेस सर्वत्र सारखी बसली होती. व बुंदेलखंडांतील बुंदेले लोकहि आपल्यावरची मुसुलमानी सत्ता धुडकावून लावण्याचा प्रयत्‍न करीत होते. बुंदेले लोकांनां मराठ्यांचे पाठबळ उत्तम रीतीनें होतेंच. १७३७त मराठ्यांनीं आग्रा व इटावा हीं दोन शहरें लुटलीं. परंतु अयोद्येच्या नबाबाचा वजीर सादतअल्ली यानें त्यांचा पराभव केला. १७५१ त सादतअल्लीचा पुतण्या सफदरजंग यानें मराठ्यांनां परत बोलाविलें पण मराठ्यांचा व सफदरजंगाचा स्नेह फार वेळ टिकला नाहीं.

१७३८ त नादीरशहानें दिल्लीवर स्वारी करून पुष्कळशी लूट नेली. त्याचा वारस अहंमदशहा-दुराणी यानें एकदां दिल्ली लुटण्याचा प्रयत्‍न केला होता परंतु सफदरजंगानें त्याचें कांहीं एक चालू दिलें नाहीं. शहाअलम् वारल्यानंतर १० वर्षांनीं दिल्लीस इरामी दुराणी लोकांचे प्राबल्य विशेष वाढलें. यांत सय्यदबंधू प्रमुख होते.

आतांपर्यंत हिंदुस्थानच्या मुसुलमानी इतिहासांत या प्रांताचा इतिहास गुंतला होता. या काळापासून मात्र पुढें सयुक्त प्रांताचा इतिहास स्वतंत्र रीतीनें देतां येईल. कारण यावेळीं अयोध्येचे नबाब स्वतंत्रता धारण करून राहिले होते व दिल्लीचे बादशहा नांवाचे होते.

अयोध्येचा नबाब सादतअल्ली हा नुसता अयोध्या प्रांताची व्यवस्था पहात नसून अलाहाबादहि त्याच्या देखरेखीखालीं होतें. सादतअल्ली व सफदरजंग दोघेहि बादशहाचे वजीर समजले जात होते. शेरशहाच्या अमदानींत अफगाण- पठणांचें प्राबल्य वाढूं लागलें. महंमदशहा बंगष हा माळवा व अलाहाबाद या प्रांतांत मुलुखगिरी करीत असे. फर्रुक्काबाद शहराची वसाहत त्यानें केलेली होती व मध्य दुआबमध्यें त्यानें स्वतंत्र राज्य स्थापिलें. १७४० मध्यें अली महंमद नांवाचा इसम रोहिलखंडांत सुभ्यावर नेमला होता, तो तिकडेच स्वतंत्र होऊं पाहत होता. सफदरजंग या अयोध्येच्या नबाबानें एकवेळ त्याला हद्दपार केलें होतें परंतु फिरून तो रोहिलखंडमध्यें मुक्रर झाला. १७४९त अलीमहंमद वारला. तेव्हां सफदरजंग रोहिलखंड व फरुक्काबाद ही अयोध्येला जोडण्याचा विचार करीत होता. या चकमकींत सफदरजंग प्राणास मुकून अहमदखान यानें अलीगड पासून कानपूरपर्यंत प्रदेश संपादन केला.

दुराण्यांची तिसरी स्वारी १७५७ त झाली. तेव्हां दुसरा अलमगीर बादशहा होता. नजीबखान नांवाच्या एका पठाण सरदाराचें प्राबल्य दिल्लीस फार वाढलें होतें, कारण तो दुराणी पक्षाचा होता. अहमदशहा दुराणी काबुलास परत गेल्यावर गाझीउद्दीननें त्याचा पराभव करण्याकरितां मराठ्यांची कुमक मागितली. या गाझीउद्दीननें १७५९ त बादशहाचा खून करून शहाअलम् (दुसरा) याला बादशाही तक्तावर बसविलें. १७६० त अहमदशहा दुराणी हिंदुस्थानांत परत आला. तेव्हां रोहिले व अयोध्येचा नबाब त्याला मिळाले. १७६१ त पानिपत येथें दुराणी व मराठे यांची फार मोठी लढाई होऊन मराठ्यांचा पूर्णपणें पराजय झाला.

पानिपतच्या लढाईपासून मराठ्यांचा मात्र बंदोबस्त झाला. पण संयुक्तप्रांतांतील इतर संस्थानिकांवर त्यामुळें कांहीच वचक बसला नाहीं. उत्तरदुआबमध्यें नजीब खान रोहिला त्रास देत होताच. जाट लोक आग्रा सर करून दिल्ली काबीज करण्यासाठीं यत्‍न करीत होते. पुढें मराठे दिल्लीस येऊन सत्ताधीश झालें. त्यांनीं अलाहाबाद प्रांताची सनद बादशहापासून मिळविली. ते हळूहळू रोहिलखंडापर्यंत पोहोंचले होते. १७७५ मध्यें सुजाउद्दैला वारल्यावर त्याचा मुलगा असफउद्दौला यानें इंग्रजांशीं तह करून बहुतेक बनारस प्रांताखालचा मुलुख इंग्रजांनां दिला. बनारसचा थोडा भाग चेतसिंग याजकडे राहिला होता. त्यानें इंग्रजांची कांही जुलमी मागणी नाकारल्यामुळें इंग्रजांनीं त्याचा प्रांत खालसा केला. इकडे मराठ्यांचा फ्रेंच सरदार डी. बॉइन यानें उत्तरदुआब, आग्रा व मथुरा हे जिल्हे सर केले. अयोध्येचा नबाब सादतअल्ली यानें अलाहाबादचा किल्ला इंग्रजांनां देऊन परचक्रापासून आपला बचाव करावा म्हणून ७६ लक्षांची खंडणी दरसाल देण्याचें कबूल केलें होतें.

१९ व्या शतकाच्या आरंभी बनारस प्रांत व अलाहाबाद किल्ला इंग्रजांकडेच होता. यावेळीं पुन्हां दुराणी हिंदुस्थानावर स्वारी करणार म्हणून अयोध्येचा नबाब सादतअल्ली याला मोठी भीति उत्पन्न झाली. म्हणून गोरखपूर जिल्हा, रोहिलखंड, अलाहाबाद, फत्तेपूर, कानपूर, इटावा, मैनपुरी, व मिर्झापूर जिल्हे व तराई परगणा एवढा प्रांत इंग्रजांनां तहाहयात दिला. एक वर्षानंतर फर्रुक्काबादच्या नबाबांनीं आपला प्रांत इंग्रजांच्या स्वाधीन केला.

१८०३ सालीं इंग्रज व मराठे यांमध्यें लढाई सुरू होऊन इंग्रज विजयी झाले व त्यांनां संयुक्तप्रांत बहुतेक मिळाला; एवढेंच नव्हें तर संयुक्तप्रांताबाहेरचा मुलुखहि त्यांच्या सत्तेखालीं आला. त्याचा विस्तार उत्तमरेस गोरखपूर (कुमाऊनप्रांत) जिल्ह्यापासून तों दक्षिणेस गोहद ग्वाल्हेरपर्यंत होता.

प्रथमतः हे सर्व प्रांत बंगाल इलाख्यांत समाविष्ट करून व्हाईसरायाच्या देखरेखीखाली ठेविले होतें. सन १८३३ त पार्लमेंटमध्यें एक कायदा होऊन वायव्येकडील प्रांत बंगालपासून अलग केले व त्या ठिकाणीं लेफ्टनंट गव्हर्नरची योजना केली. वायव्येकडील प्रांतांत त्या वेळेस आग्रा प्रांत (सांप्रतचा) व शिवाय दिल्ली व अजमीर प्रांत येत होते. १४ वर्षानंतर मेरवाडा वायव्यप्रांतांत समाविष्ट केला गेला आणि नर्मदा व सागरप्रांत १८५३ त सामील केले. बुंदेलखंड, झांशी, जालवण व हमीरपूरचा भाग १८४० ते ५३ पर्यंत संयुक्तप्रांताला जोडले गेले. १८५६ त अयोध्याप्रांत जोडला. बंडानंतर लागलीच दिल्ली प्रांत पंजाबकडे, अयोध्येच्या उत्तरेचा तराई प्रांत नेपाळकडे आणि बरेली व मुरादाबाद यांतील थोडीं गांवें रामपूरच्या नबाबाकडे देण्यांत आलीं. सागर व नर्मदा प्रांत मध्य प्रांताकडे १८६१ सालीं देऊन अजमेर- मेरवाडा १८७१ सालीं हिंदुस्थान सरकारनें आपल्याकडे वर्ग करून घेतले. झांशी व बारिया जिल्ह्यांतहि आशाच प्रकारचे थोडेथोडे फेरफार केले.

पण बर्‍याच दिवसांपासून सुरू असलेली बेबंदशाही एकाएकी नाहींशीं होईना. रोहिलखंडांत १८१६ सालीं घरपट्टीवरून बराच असंतोष माजला. तसेंच सहाराण पुरांत १८२४ सालीं डाकू लोकांचा फार सुळसुळाट झाला. संबंध प्रांतांत ठगांचा उपद्रव असून, जलमार्गावर सुद्धां चांचेगिरी चालू होती.

१८५७ सालीं, शिपायांचें बंड झालें. त्यांत बरेलीं, फरुक्काबाद, बांदा, कानपूर, झांशी येथील राजांनीं पुढारी पणा घेतला होता. तेव्हां या प्रांतांत बंडवाल्यांचा मोठा जोर होता. आग्रा व अलाहाबादचे किल्लेच फक्त इंग्रजांकडे होते. परंतु लवकरच दिल्ली व कानपूर बंडवाल्यांपासून घेऊन रोहिलखंडहि सर करण्यांत आलें. सर ह्यू रोजनें मध्यहिंदुस्थानपर्यंत जाऊन झांशी घेतली. अशा रीतीनें कंपनी सरकारनें संबंध बंडाचा मोड करून जिकडे तिकडे शांतता प्रस्थापित केली. पोलिसखात्याची स्थापना करून लोकांनां निःशस्त्र केलें व मोठे किल्ले जमीनदोस्त करून टाकले.

ऐतिहासिक अवशेष- या प्रांतांत अशोकाचे शिलालेख काशी, अलाहाबाद, कालसी (डेहराडून जिल्हा) या ठिकाणीं आहेत. बनारसजवळ सारनाथ येथील, गोरखपूर जिल्ह्यांत कासिया येथील, व बस्ती जिल्ह्यांत पिप्रावा येथील स्तूप व त्यांवरील कोरीव लेख ख्रिस्तपूर्व ३ र्‍या व ५ व्या शतकांतील असावेत. हिमालयाचा भाग सोडून संयुक्तप्रांताच्या प्रत्येक भागांत बौद्धंचे अवशेष- इमारती, नाणी, शिक्के वगैरे आढळून येतात. मथुरा व ललितपूर येथील जैन देवळें व खोंदीव कामें उत्तम स्थितींत सांपडतात.

महाभारत व रामायणांतील ऐतिहासिक स्थळांशिवाय अलीकडील इसवी सन चवथ्या व पांचव्या शतकांतील गुप्तांचे अवशेष या प्रांतांत सांपडतात. गुप्‍तघराण्यांतील ताम्रपट गोरखपूर, गाझीपूर, इटावा व बुलंदशहर जिल्ह्यांत आढळले आहेत. झांशी जिल्ह्यांत देवगड येथील लहान पण सुंदर देऊळ याच काळांतलें आहे. कनोज, जोनपूर, अयोध्या, मथुरा आणि बनारस येथें अशा इमारती आढळून येतात कीं, पूर्वी ती हिंदु देवळें असून त्यांचें रूपांतर मशिदींत झालेलें आहे; व म्हणूनच सांप्रतच्या हिंदु क्षेत्रांतून सुद्धां जुन्या हिंदु इमारती अगर देवळें मुळींच आढळत नाहींत. हरिद्वार, अयोध्या, बनारस आणि मथुरा येथील देवळें अलीकडील बांधणीचीं आहेत. अकबर बादशहा धर्मद्वेष्टा नव्हता. म्हणूनच वृंदावन येथील सुंदर देवळें त्याच्या कालांत झालीं. १५९० सालीं बांधलेलें वृंदावन येथील देऊळ भव्य व सुंदर आहे.

मुसुलमानी इमारती मशिदी, इदगा थडगीं या रूपांत पुष्कळ आहेत. त्यांत बदौन येथें १३ व्या शतकांत अल्तमश बादशहानें बांधलेल्या कांहीं इमारती आहेत. जोनपूर येथील मशीदी फार सुंदर व प्रेक्षणीय आहेत. या मशीदींचे मनोरे उंच असून मनाला थक्क करून सोडणारे आहेत व ते पाहून पुष्कळ अंशीं ईजिप्‍तमधील मनोर्‍यांची आठवण होते.

१६ व १७ व्या शतकांत अकबर, जहांगीर व शहाजहान यांनीं फत्तेपूर, शिक्री व आग्रा येथील इमारती बांधण्यांत अनोनात द्रव्य खर्च केलें. राजवाडे, भव्य व सुंदर थडगीं व मशीदी हीं पाहतांक्षणीच मोंगल बादशहांच्या वैभवाची साक्ष पटते. १८ व्या शतकांत अयोध्येच्या नबाबांनीं व रोहिल्यांनीं अशाच कांहीं इमारती बांधल्या आहेत.

पंजाब, इतिहास- फार प्राचीन काळी आर्य लोकांनीं पंजाबांत वस्ती केली होती व ॠग्वेदाचाहि कांहीं भाग पंजाबांतच रचला गेला हें पूर्वी विशद केलेंच आहे. ॠग्वेदांत सरस्वती व इतर नद्यांचा उल्लेख आहे. सतलज व बियास यांस शुतुद्रि व बिपाश असें संबोधिलें आहे. तदनंदरच्या वैदिक काळांत आर्य लोक आग्नेयीस वळले व ठाणेश्वराजवळ कुरुक्षेत्रांत प्रख्यात भारतीय युद्ध झालें. युधिष्ठिराचें इंद्रप्रस्थ हें हल्लीचें दिल्ली शहर होय.

ख्रिस्तपूर्व ३२६ ह्यावर्षी ओहिंद या जागी सिंधु नदी उतरून अलेक्झांडरनें पोरस राजाच्या मांडलिकांवर प्रथम स्वारी केली. ह्या प्रांताची राजधानी तक्षशिला ही सिंधुनदीपासून ३ दिवसांच्या वाटेवर होती. तक्षशिला ही फार प्रेक्षणीय व भरभराटीस आलेली नगरी होती. ती घेऊन अलेक्झांडर झेलमकडे वळला. झेलमवर पोरस (पुरु) राजाची व त्याची गाठ पडली. अलेक्झांडरनें त्याला आपला मित्र बनविलें व त्याचें राज्य त्याला परत दिलें. नंतर पोरसचा पोरस याच नावाचा एक पुतण्या होता त्याच्यावर अलेक्झांडरनें स्वारी केली व त्याचा पराभव करून त्याला रावीपार घालविलें. नंतर पिंप्रम व संगल घेतलें पण पुढें त्याचे सैनिक त्रासून गेल्यामुळें तेथून तो परत फिरला. नंतर सिंधप्रांतावर त्यानें स्वारी केली व कांही भाग आपल्या ताब्यांत घेतला. पण तिकडील स्थानिक राजांनीं तो त्यास पंचू दिला नाहीं. याचें चरित्र अलेक्झांडर धी ग्रेट या शब्दाखालीं दिलें आहे तें पहावें.

अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर पोरसनें सिंधमधून तेथील यवन अधिकार्‍यांस हांकून दिलें. पुढें सहा वर्षांनीं चूडासमा यांनीं पोरसचा सूड घेण्यासाठीं त्याचा विश्वासघात करून खून केला. त्याबरोबर सर्व राष्ट्र मॅसिडोनियन सत्तेविरुद्ध उठलें व चंद्रगुप्‍त मौर्य यानें पंजाब व सिंधु नदीकांठचा मुलूख आपल्या ताब्यांत घेतला. चंद्रगुप्तानें पंजाबांतील सर्व लोक ग्रीक लोकांच्या विरुद्ध एक केले. पुढें १६ वर्षानंतर (ख्रिस्तपूर्व ३०५) जेव्हां सेल्युकस निटेतर यानें हिंदुस्थानावर स्वारी केली तेव्हां चंद्रगुप्‍त प्रबळ झाला होता व त्यामुळें निकेटरला, सिंधुनदीच्या पश्चिमेचा मुलूख व आपली स्वतःची मुलगी चंद्रगुप्तास देणें भाग पडलें. चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार व नातू अशोक यांच्या कारकीर्दीत पंजाबांत बुद्ध धर्मास राजाश्रय मिळाला. ही गोष्ट तोप्रा येथील स्तंभ व भावलपूर संस्थानांतील सुई विहार येथील बुद्ध अवशेषांवरून दिसून येते. मौर्य घराण्याच्या कारकीर्दीत सतलजपासून हिंदूकुश पर्वतापर्यंतच्या प्रदेशाची व सिंधचीहि तक्षशिला ही राजधानी होती. अशोकाच्या पश्चात ग्रीस व बॅक्ट्रिया प्रदेशांचा राजा युथीडीमस यानें हिंदुस्थानांत आपली सत्ता वाढविली. परंतु त्यास सुभगसेन यानें अडथळा केला. ह्यानंतर दहा वर्षांनीं (ख्रिस्तपूर्व १९५) युथीडीमसचा मुलगा डेमिट्रीयस यानें पश्चिम पंजाबमध्यें आपली सत्ता स्थापिली व संगल शहर पुन्हां वसवून त्यास युथीडीनिया असें नांव दिलें. या पुढील माहिती मिन्यांडरनें ग्रीक व बॅक्ट्रियन सत्तेचा पुन्हां उत्कर्ष करीपर्यंत आढळत नाहीं. मिन्यांडरचें राज्य पंजाबांत बरेंच पसरलें होतें असें प्लुटार्क म्हणतो. परंतु पश्चिमेकडील रानटी लोकांच्या लाटांनीं हें सर्व राज्य लयास गेलें.

पुढें (ख्रिस्तपूर्व १००) शक राजा मौसमोगा यानें पंजाबच्या वायव्येकडील भागांत राज्य स्थापिलें व तक्षशिला ही आपली राजधानी केली. यूएची वंशीय कुशान लोकांचा नायक कुज्जुलकर कडफिसेस यानें शक राजावर स्वारी करून हिंदुस्थानांतील शेवटचें ग्रीक राज्य पादाक्रांत केलें. त्याचा पुत्र बेमो कडफिसेस यानें संबंध वायव्य हिंदुस्थान काबीज केलें (इ.स. १०). सुमारें इ.स. १५ सालीं गोंडोफेरसच्या आधिपत्याखालीं पार्थियन लोकांचा पंजाबांत अंमल बसला. पण पर्थियन सत्ता फार वेळ टिकली नाहीं. कारण इ.स. ७८ सालीं कनिष्काच्या नेतृत्वाखालीं कुशान लोकांनीं आपली सत्ता पुन्हां मिळविली. कनिष्कानंतर हुविष्क व जुष्क (वासुदेव) हे गादीवर आले. वासुदेवाच्या वेळीं कुशान लोकांचें राज्य पंजाबांत थोड्या प्रदेशावर राहिलें. त्यानंतर लहान यूएची सोकांचा नायक कितोला यानें तें राज्य बळकाविलें. पांचव्या शतकाच्या मध्यांत श्वेतहूणांनीं या प्रांतावर स्वारी केली. तोरमाण व त्याचा मुलगा मिहिरकुल यांच्या कारकीर्दीत या हूण लोकांचें पंजाबांत बरेंच दूरवर राज्य पसरलें होतें. संगल ही त्यांची राजधानी होती. राजतरंगिणीमधील मिहिरकुल हाच होय. यानें काश्मीर मध्येंहि आपलें राज्य स्थापिलें. ५४४ मध्यें कारोर येथें त्याचा व सिथियन सत्तेचा नाश झाला. अशोकानंतर पंजाबचा धार्मिक इतिहास चांगलासा माहित नाहीं. तरी पण मिहिरकुलाच्या वेळीं बौद्ध धर्माचें महत्त्व नाहीसें झालें हें त्यानें केलेल्या बौद्धांच्या छळावरून स्पष्ट होतें.

सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात ठाणेश्वर येथें एक प्रबळ राज्य स्थापिलें गेलें. यामध्यें झेलम नदीच्या पूर्वेकडील पंजाबच्या भागाचाच काय तो समावेश होत असे. कारण ह्युएन म्हणतो कीं, तक्षशिला व सिंधपूर हे काश्मीरच्या ताब्यांत होते व सिंधूपासून बियासपर्यंतचा मध्यपंजाब संगल राज्यांत असून त्याची राजधानी शाकल ही होती. व मुलतान हें त्या राजाचें मांडलिक संस्थान होतें. आठव्या शतकाच्या आरंभीं ठाणेश्वराचें महत्त्व कमी झालें व कनोजचे तोमर राजे यांनीं आग्नेय पंजाबांत राज्य स्थापिलें. व हंसी घेऊन दिल्ली शहर बसविलें. एका शतकानतर तोमर राजाच्या जागीं अजमीरचें चव्हाण राजे आले. ही गोष्ट ११५१ त घडली.

मुसुलमान लोकांनीं पंजाबांत दोन मार्गांनीं स्वार्‍या केल्या. इ.स. ६६४ सालीं एक मुसुलमान सेनापति मुलतानपर्यंत आला होता. परंतु त्या स्वारीचा कांहीच परिणाम झाला नाहीं. पुढें (७१२) महंमद कासीम यानें सिंध जिंकून मुलतान घेतलें. मुलतान हें दाहीर राजाच्या मुलखांत असून रावी नदीच्या उत्तरेस होतें. मुलतानहून त्यानें पुढें दुसर्‍या स्वार्‍या केल्या. झेलम नदीच्या कांठचें ब्रह्मपूर, सारकोट व कारूर घेऊन देपालपूरहून हिमालयाच्या पायथ्याकडे स्वारी केली. परंतु त्याच्या चुकांमुळें त्याला पुढें जातां आलें नाहीं. व मुलतान व पंजाब मुसुलमानांच्या ताब्यांतून निसटला.

इ.स. ८७१ च्या सुमारास मुलतान प्रांत अरबांच्या अंमलखालीं पुन्हां आला. बाकीचा पंजाब हिंदु राजांच्या ताब्यांत होता. ओहिंद येथें ब्राह्मण राजे राज्य करीत होते तसेंच जालंधर अथवा त्रिगर्त हें एक प्रबळ हिंदु राज्य होतें.

सुमारें एक शतकानंतर पुन्हां हिंदुस्थानावर मुसुलमानांच्या स्वार्‍या सुरू झाल्या. इ.स. ९७९ मध्यें लाहोरचा राजा जयपाळ हा गझनीचा अमीर सबक्तगीन याजवर चालून गेला. लघमान येथें त्यानें सबक्तगीनचा पराभव केला. जयपाळचे दिल्ली, अजमीर, कालिंजर व कनोज येथील राजांशीं स्नेहसंबंध होते. पुढें नऊ वर्षांनीं सबक्तगीननें सिंधु नदीपर्यंतचा मुलूख आपल्या ताब्यांत घेतला. सबक्तगीनच्या नंतर गझनीकर महमूदनें १००१ सालापासून हिंदुस्थानावर स्वार्‍या करण्यास सुरुवात केली. याची माहिती याच्या नांवाखालीं (गझनी घराणें- ज्ञानकोश वि. १२) पहावी. लागोपाठ पराभव झाल्यानें जयपाळानें स्वतःस जाळून घेतलें. त्याचा मुलगा अनंगपाळ यानें मुलतानाचा सुभेदार अबुलफतेह लोदी याची मदत घेतली तरी पण १००६ सालीं त्याचा पेशावर येथें पराभव झाला. पुन्हां अनंगपाळानें सर्व हिंदु राजांचा एक जंगी संघ तयार केला व महमुदास तोंड दिलें पण त्यांतहि आपसांतील फाटाफुटीनें त्याचा पेशावर येथें पराभव झाला. या संघांत उज्जनी व ग्वाल्हेर वगैरे दूरदूरचे राजे सामील झाले होते. नंतर महमूद यानें नगरकोट (कांग्रा) लुटलें. १०१० सालीं महमूदनें मुलतानवर स्वारी करून तेथील लोदी सुभेदारास हद्दपार केलें. इ.स. १०१४ सालीं त्यानें नंदनत्रिलोचनपाल यास काश्मीरकडे पिटाळलें. याच वर्षी यानें ठाणेश्वर लुटलें. पुढें (१०२१) त्रिलोचनानें महमुदाशीं लढाई केली पण तींत महमुदाचा जय झाला व त्रिलोचन मारला गेला. शिवालिक (हंसी) प्रांत महमुदाचा पुत्र मसूद यानें जिंकला. पुढें १०४१ सालीं तुर्कांनीं घालवून दिल्यानें मसूद पंजाबांत येऊन राहिला व त्याचें राज्यहि पंजाबपुरतेंच उरलें.

नंतर १४० वर्षांनीं (११८१) मलिक खुश्रूपासून महंमद घोरीनें लाहोर घेतलें. यानें मुलतान (११७५) व पेशावरहि (११७९) घेतलें. महंमदनें ११८१ सालीं लाहोर घेऊन सरहिंद घेतलें व पृथ्वीराजावर स्वारी केली. परंतु पृथ्वीराजानें त्याचा ठाणेश्वराजवळ तलावरी येथें मोड केला, परंतु पुन्हां नवें सैन्य घेऊन तो चालून आला व त्यानें पृथ्वीराजाचा ठाणेश्वराजवळ पराभव करून त्यास कैद केलें. या जयामुळें अजमीर आणि सर्व सिवालिक राज्य, हें महंमदाच्या हातीं आलें. कुतुबुद्दीन ऐबक यानें ११९३ मध्यें दिल्ली घेऊन या स्वारीचें कार्य पुरें केलें.

महंमदाच्या मरणानंतर कुतुबुद्दीन लाहोरास स्वतंत्र राजा झाला. त्याच्यानंतर नासिरुद्दीन कुबाचा यानें पुढें पंजाब आपल्या हाताखालीं घातला. परंतु ताजुद्दीन गझनीकर यानें नासिरुद्दीनापासून पंजाब हिसकावून घेतला. नंतर त्यानें दिल्लीस अल्तमशवर स्वारी केली पण त्यामध्यें त्याचा पराभव होऊन तो अल्तमशच्या हातीं सापडला व अशा रीतीनें अल्तमश पंजाबचा राजा झाला. याप्रमाणें पंजाब प्रांत दिल्लीच्या बादशहाच्या ताब्यांत गेला. मध्यंतरी ख्वाँरिझमि लोकांस मध्यआशियामधून चेंगीझखान मोंगल यानें हांकून लावलें. तेव्हां त्यांचा सुलतान जलालुद्दीन हा पंजाबमध्यें मुलतानकडे आला व नासिरुद्दीनवर हल्ला करून त्यानें तो प्रांत काबीज केला. ही पंजाबवरील पहिली मोंगल स्वारी होय. पुढें जलालुद्दीनवर चेंगीझखान यानें सैन्य पाठविलें. त्या सैन्यानें मुलतान मिळविलें. (१२२३). आणि दुसर्‍या एका मोंगल सैन्यानें जलालुद्दीनास पंजाब सोडावयास लावलें. जलालुद्दीन यानें पळतां पळतां युच्च शहर जाळून टाकलें.

यानंतर पांच वर्षांनीं अल्तमशनें नासिरुद्दीन याचा पराभव केला व मुलतान, युच्च व सिंध आपल्या राज्यास जोडिलीं. त्याची सत्ता सर्व पंजाबभर होती व तिला बगदादच्या खलिफानें १२२९ त मान्यता दिली होती. रेझिया सुलतान ही गादीवर आल्यावर लाहोर, हंसी व मुलतान येथील मांडलिकांनीं तिची सत्ता झुगारून दिली. इतक्यांत (१२४१) एका मोंगल सैन्यानें लाहोर लुटलें व युच्च व सिंध स्वतंत्र झालें. पुढें (१२४६) बलबन यानें मोंगलांस युकचा वेढा उठविण्यास भाग पाडलें. यानंतर २० वर्षेपर्यंत बलबन व त्याचा भाऊ शेरखान यांनीं मोंगलांस थोपवून ठेवलें तरी पण मोंगलांनीं सिंधूच्या मुलुखांत आपले पाय रोंवले. अल्लाउद्दीन खिलजीच्या वेळीं (१२९६-१३०५) तो दक्षिणेकडे गुंतला असतां मोंगल लोक पंजाबवर चढाई करीत होते. बरोबर २ लाख फौज घेऊन ते दिल्लीस पोहोंचले पण तेथें त्यांचा मोड झाला (१२९८). पुन्हां (१३०३) त्यांनीं दिल्लीस येऊन शहरास वेढा दिला. परंतु याहि खेपेस त्यांचा मोड झाला. याप्रमाणें दरवर्षी (१३०४ पर्यंत) ते पंजाबमध्यें स्वार्‍या करीत. एकदोनदां त्यांचा जय होऊन त्यांनीं मुलतान व शिवालिक वगैरे भाग जिंकला. परंतु ते परत जात असतांना पंजाबचा सुभेदार गाझी बेग यानें त्यांचा धुव्वा उडविला. त्यानंतर १३१६ पर्यंत त्यांच्या स्वार्‍यांचा त्रास झाला नाहीं. १३१६ त अल्लाउद्दीन मरण पावला, नंतरचार वर्षे बंडाळी माजली व दिल्लीस तुघलक वंश गादीवर आला. त्याच्या हातून जरी मोंगलांपासून मुलतानचें रक्षण झालें नाहीं तरी दिल्लीचें रक्षण करण्यासाठीं त्यानें त्यांस जबर लांच भरला. वायव्यसरहद्दीकडे याच सुमारास (१३४३) अफगाण लोकांनीं त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनीं मुलतान घेतलें, सनाम व सामानाजवळील मुलुखांत बंड झालें व गख्खर लोकांनीं लाहोर काबीज केलें. फिरोज तुघलखांपासून पंजाबाच्या अर्वाचीन इतिहासास विवक्षित वळण लागलें. त्यानें बरेच कालवे खणले, मुख्यतः यमुनेचे कालवे हे यानेंच खोदलेले आहेत. त्यानें हिस्सार गांव स्थापिलें, सरहिंद हा स्वतंत्र सुभा केला. नागरकोट (कांग्रा), सिरमूर व अंबाल्याच्या उत्तर भाग काबीज केला. पुढें १३९० त खोकर लोकांनीं लाहोर घेतलें. १३९५ त सर्व साम्राज्यांत अव्यवस्था माजली तेव्हां देपालपूरचा सुभा सारंगखान यानें स्वतःच मुलतानवर हल्ला केला, या गडबडींत मोंगल पुन्हां आले. १३९७ त पीर महंमद यानें युक घेऊन मुलतानवर स्वारी केली व तें घेतलें (१३९८). या योगानें तैमूरचा मार्ग सुलभ झाला. मिठाच्या डोंगरांच्या दक्षिणेस सिंधु उतरून तैमूरनें तलंब लुटलें व तो अजोधनहून भाटनेरला आला. नंतर फतेहाबादहून तोहना ओलांडून कैथाल व पानिपत मार्गानें दिल्लीस आला व त्यानें दिल्ली लुटली. यमुनापार होऊन त्यानें हरद्वारवर हल्ला केला. सिरमूरच्या राजाचा पराभव करून सिवलिकमधून पुढें जाऊन त्यानें नगरकोट घेतलें. जम्मूहि त्याच्या हातीं लागलें. मार्चमध्यें तो बन्नु येथें राहिला (१३९९). या स्वारीमध्यें तैमूरनें हजारों पुरुष, बायका, मुलें यांची कत्तल केली व एकंदर मुलुखाची राखरांगोळी केली. त्यानें खिजरखानास मुलतानास ठेविलें. त्याच्या पश्चात दिल्लीच्या तक्ताबद्दल पुन्हां झगडा सुरू झाला व भयंकर दुष्काळ आणि रोगाची साथ सर्व देशभर पसली. त्याचा फायदा घेऊन पंजाबचे सरदार लोक स्वतंत्र झाले. व बाबरच्या वेळेपर्यंत दिल्लीच्या राजांनां त्यांच्यावर अंमल बसवितां आला नाहीं. १४१४ त खिजरखानानें दिल्ली सर केली व सय्यद वंशाची स्थापना केली. परंतु हे सय्यद राजे मागील राजांप्रमाणेंच नामधारी होते. त्यामुळें काबूलचा मोंगल सुभेदार पंजाबमध्यें ढवळाढवळ करी. सरहद्दीवर कोणी तरी मजबूत सुभेदार रक्षण करण्यास असावा असें वाटून बहलोल लोदी यास १४४१ मध्यें देपालपूर व लाहोर येथें नेमिलें पण बहलोल यानेंच खोकर लोकांशी तह करून १४५१ मध्यें दिल्ली काबीज केली व अफघाण अथवा पठाण वंशाची स्थापना केली. लोदी राजांच्या अंमलांत पंजाबमध्यें साधारण शांतता नांदली; कारण तेव्हां तेथें लुटण्यासारखें कांहीच उरलें नव्हतें. पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदी यानें समरकंदच्या बाबरची मदत घेऊन स्वतंत्रता धारण केली व बाबरास लाहोर दिलें. बाबरनें देपालपूर घेऊन दिल्लीवर चढाई केली (१५२६) आणि पानिपत येथें दिल्लीचा बादशहा इब्राहीम लोदी याचा पराभव केला. व मोंगलांचें राज्य स्थापिलें.

बाबरच्या पश्चात पुन्हां अफगाणांनीं पंजाब घेतला. तेव्हां बाबरच्या दुसर्‍या मुलानें (कामरान) अफगाणांपासून पंजाब आपल्या ताब्यांत घेतला. १५४० मध्यें शेरशहानें हुमायुनास हिंदुस्थानांतून इराणांत हांकून लाविलें. व पंजाबामध्यें आपला अंमल बसविला व झेलम जिल्हांतील रोहटस गांव वसविलें. पुढें (इराणी) शहाची मदत घेऊन हुमायूननें कामरान यास काबूलहून हांकून लाविलें यावेळीं दिल्लीस हिमू हा विक्रमाजित हें नांव धारण करून बादशहा बनला होता. नंतर (१५५५) त्यानें सरहिंद येथें शिकंदर सूरि या अकबरानें पंजाबच्या सुभेदाराचा पराभव केला आणि दिल्ली घेतली. हिमूचा पानिपत येथें पराभव केला होता.

अकबर गादीवर आल्यापासून मोंगली साम्राज्य पूर्ण पणें प्रस्थापित झालें. व वीस वर्षाच्या दीर्घकालीन युद्धानंतर पंजाबांत शांतता नांदूं लागली. अकबरानें १५८६ त स्वारी करून वायव्येकडील मुलुख ताब्यांत आणिला. अकबराच्या राज्यापासून पंजाबचाहि बराच फायदा झाला. त्याच्या वेळींच तेथील आर्वाचीन काळची जमीनधार्‍याची पद्धत सुरू झाली. जहांगीरच्या वेळीं त्याचा मुलगा खुश्रू यानें बंड करून लाहोर घेतलें; तेव्हां स्वतः जहांगीरनें तें बंड मोडलें व बंडखोरांस कडक शासन केलें. जहांगीर यास १६२६ त महाबतखानानें झेलम नदीच्या कांठीं त्याच्या परिवारासह कैद केलें. पुढल्यास वर्षी भिम्वर येथें जहांगीर मरण पावला. लाहोरजवळ शहादरा येथें त्याचें दफन केले. त्याची कबर प्रेक्षणीय आहे. जहांगीरनें आपल्या कारकीर्दीच्या शेवटीं पाच वर्षे लाहोर ही राजधानी केली होती. पुढें (१६२८) शहाजहान गादीवर बसला. त्यानें आग्रा येथें राजधानी नेली. त्याच्या शाहरियार या धाकट्या भावानें लाहोर येथें बंड केलें. पण त्याचा आसफखान यानें पराभव केला व त्यास त्याच्या अनुयायांसह ठार मारिलें. शहाजहानच्या कारकीर्दीत पंजाबांत भरभराट व स्वस्थता राहिली व बाहेरील स्वार्‍या विशेष झाल्या नाहींत. तरी पण सरहद्दीपलीकडे लढाया सुरूच होत्या. मोंगलांनीं १६३९ त कंदाहार घेतलें. पण दहा वर्षानंतर त्यांनां तें परत द्यावें लागलें. पुढें १६५२ मध्यें तें पुन्हां घेण्यासाठीं औरंगझेब व दाराशिकोह यांनीं केलेला प्रयत्‍न फसला. बल्क व बदकशान येथें मिळालेल्या विजयानें औरंगझेबाच्या हिंदुकूश पर्वतांतील पराजयावर विरजण पडलें. पुढें १६५७ त औरंगझेबाकडून दाराचा पराभव झाल्यामुळें तो पंजाबांत पळून आला. त्याला तेथें कांही अनुयायी मिळाले पण त्यांचा कांही उपयोग झाला नाहीं. दारास तेथूनहि पळून जावें लागलें.

औरंगझेबाच्या वेळी पंजाबमध्यें शहाजहानच्या कारकीर्दीप्रमाणेंच स्वस्थता नांदत होती. फक्त १६७३-७५ मध्यें अफगाण लोकांनीं बंड केलें होतें व याचप्रमाणें नारनोळ येथेंहि १६७६ त बंड झालें. अफगाण लढाई दोन वर्षे चालली व अखेर औरंगझेबानें कपट करून अफगाणांची कत्तल करून ती संपविली. नारनालच्या सत्‍नामीप्रमाणें आग्रयाचे व अजमीरचे हिंदु बादशाही सैन्याच्या तुकड्यांचा पराभव करून दिल्लीवर चाल करून आले. सर्व सैन्यांत गडबड झाली. पण औरंगझेबानें सैन्याला धीर देऊन हिंदूंशीं तोंड देऊन त्यांचा मोड केला. औरंगझेबाच्या मरणाच्या वेळीं मोंगली साम्राज्याच्या नाशाचीं चिन्हें दिसूं लागली व १७०७ नंतर पंजाबमध्यें एका नवीन सत्तेचा उदय झाला.

ही नवीन सत्ता म्हणजे शीख सत्ता होय. शीख हे बाबा नानक यानें स्थापिलेल्या धार्मिक पंथाचे लोक होत. बाबा नानक लाहोरजवळ पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात जन्मला व डेरानानक या रावी नदीच्या कांठच्या गांवीं १५३८ त वारला. याची सविस्तर माहिती प्रिन्सेपच्या पंजाबच्या इतिहासांत आहे. शिवाय ज्ञानकोश विभाग १६ (न. पृ. २००) पहा. नानकानंतर चवथा गुरु जो रामदास त्यानें अकबरापासून ज्या जागीं हल्लीं शीख धर्माचें केंद्र अमृतसर शहर आहे तें मागून घेतलें. या जागीं त्यानें एक तलाव बांधून त्यामध्यें एक देऊन बांधण्यास सुरुवात केली. त्याचा मुलगा अर्जुनमल्ल यानें तें काम पुढें चालविलें. तो मोठ्या ऐश्वर्यात राहत असे व त्यानें पंजाबांत आपल्या पंथाचे लोक पुष्कळ वाढविले. आणि त्यांच्यामध्यें लष्करी शिक्षणाचा प्रसार केला. त्यामुळें मोंगल सरकारला त्यांचा मत्सर वाटूं लागला. शेवटीं लाहोरच्या सुभेदारानें त्यांस पकडून लाहोर येथें कैद करून आणून त्यांचा क्रूरपणानें वध केला. या कृत्यामुळें शीख लोक धार्मिक पंथापासून परावृत्त होऊन लढवय्ये बनले. त्यांच्या गुरूच्या खुनामुळें त्यांच्यांत सुडाचें वारें शिरलें. व अर्जुनमल्लाचा मुलगा हरगोविंद यानें या कामीं पुढाकार घेतला ते सरकारशीं उघडउघड विरोध करूं लागले. आणि गुरु गोविंदसिंग याच्या वेळीं तर शिखांचें एक राष्ट्रच बनलें. मुसुलमानांनीं गुरुगोविंदाच्या बायकामुलाची कत्तल केली. या मुसुलमानांच्या क्रूरतेनें शीख लोकांस बेहोष करून धर्मवेडे बनविलें. गुरुगोविंदाचा शिष्य बंदा याच्या नेतृत्वाखालीं त्यांनीं पूर्वपंजाबांत धुमाकूळ सुरू केला व मुसलमानांस त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनीं सरहिंदच्या सुभेदाराचा पराभव केला व तेथें आपलें ठाणें दिलें. तेथून सतलज व यमुना यांच्या काठांनीं ते सहाराणपूर पर्यंत गेले. तेथें त्यांनां प्रतिरोध झाला. त्यामुळें ते लुधियाना व त्या जवळचा मुलुख यामध्यें येऊन राहिले पण तेथेंहि फार वेळ पर्यंत स्वस्थ बसले नाहींत. त्यांनीं लवकरच लाहोर ते दिल्ली पर्यंतचा सर्व मुलुख लुटून घेतला. त्यामुळें बहादुरशहास त्यांच्यांशीं लढण्याकरितां स्वतः दक्षिणेंतून उत्तरेस यावें लागलें. त्यानें शीख लोकांस डाबेरच्या किल्ल्यांत कोंडलें पण गुरु बंदा यानें भयंकर संग्राम करून त्यांचा वेढा फोडला. पुढें १७१२ त बहादुरशहा मरण पावला व शीख लोकांचें पारिपत्य करणें राहून गेलें. नंतरच्या गडबडींत शीख लोकांनीं आपली शक्ति वाढविली व भोंवतालच्या मुलुखांत आपलें बस्तान बसविलें तेव्हां १७१६ त फर्रुकसिरयनें अब्दुस समदखान यास शीखांवर पाठविलें त्यानें त्यांचा पुष्कळ ठिकाणीं पराभव केला व बंदा यास बंदीवान करून दिल्लीस पाठविलें. तेथें त्याचा अमानुष रीतीनें वध झाला. त्यानंतर शीख लोकांचा अतिशय छळ झाला.

पुढें १७३८ त नादीरशहानें पंजाबवर स्वारी केली, थेट दिल्लीवर जाऊन दिल्ली घेतली. तो परत गेल्यावर दिल्लीचें राज्य मोडकळीस आलें. त्याचा फायदा घेऊन शीख लोकांनीं पुन्हां उचल केली, तींत शिखांचा मधून मधून पराभव झाला. तरी त्यांचे बळ वाढतच चाललें. यानंतर १७६२ सालीं शीख लोकांवर पुन्हां संकट आलें. अहमदशहा अबदालीनें त्यांचा मोड केला व त्यांचा सतलजपर्यंत पाठलाग केला. परत जातांना यानें अमृतसर शहराचा नाश केला व तेथील देऊळ पाडिलें, तळें गाळानें भरून टाकलें व तेथें गोवध केला. पण अबदाली गेल्यावर शिखांनीं पुन्हां देऊळ वगैरे बांधून मुसुलमानाविरुद्ध लढाया करून आपलें स्वातंत्र्य मिळविलें.

या सुमारास शीख धर्माचें स्वरूप बरेंच पालटलें होतें. नानकाच्या वेळचें सोंवळेपणाचें स्वरूप जाऊन तेथें लढवय्येपणाचें पाणी खेळूं लागलें. बरेच संघ स्थापन होऊन त्यांचें मुख्य केंद्र अमृतसर शहर बनलें. दिल्लीच्या बादशहानें पंजाब प्रांत अहमदशहास दिला होता पण वास्तविक अहमदशहाची तेथें बिलकुल सत्ता नव्हती. १७६३ नंतर लवकरच शीख लोकांनीं तेथें आपली सत्ता स्थापिली. पुढें १८०९ त अफगाण राज्यक्रांति झाली. तिच्यामुळें त्यांचें चांगलेंच फावलें. रणजित सिंगानें लाहोर काबीज केलें (१७९९). त्यानें हळू हळू आपली सत्ता बहुतेक पंजाबवर बसविली व जवळच्या कांहीं शीख जहागीरदारांवर स्वारी केली (१८०८). त्या वेळीं त्या शीख जहागीरदारांनीं इंग्रजांचें साहाय्य मागितलें तेव्हां इंग्रज व रणजितसिंग यांच्यामध्यें तह झाला. त्यांत सतलजच्या पश्चिमेस रणजिताने स्वारी करू नये व परस्परांचा स्नेह असावा असें ठरलें. इंग्रजांनीं रणजितच्या सतलज नदीपलीकडील सर्व मुलुखाचें स्वामित्व कबूल केलें. रणजितनें शेवटपर्यंत वरील तह पाळिला. रणजितसिंह यानें १८१८ त मुलतान घेतलें व पंजाबच्या अगदीं दक्षिणेपर्यंत आपलें राज्य वाढविलें. त्याच वर्षी त्यानें सिंधु नदी ओलांडून पेशावर काबीज केलें व काश्मीरहि जिंकिलें. तो १८३९ त मरण पावल्यानंतर त्याचा मुलगा खरकसिंग हा गादीवर बसला पण तोहि एक वर्षानें मेला. नंतर रणजितच्या राज्यांत घोटाळा माजला. कांही शीख सरदारांनीं इंग्रजी प्रांतांत लुटालूट केली. यामुळें लाहोरदरबारचें व इंग्रजांचें वांकडें आलें व दरबारांतील फाटाफुटीचा फायदा घेऊन इंग्रजांनीं युद्ध पुकारलें. १८४५ च्या दिसेंबरमध्यें येथें पहिली लढाई झाली. आपसांतील फुटीमुळें शिखांचा पराभव झाला. तीन दिवसांनीं फिरोजशाह येथें दुसरी लढाई झाली. या लढाईत दोन्ही बाजू समबल ठरल्या. नंतर २२ जानेवारी १८४६ रोजी अलिवाल येथें लढाई झाली. तींत इंग्रज यशस्वी झाले. यानंतर शिखांचें सोब्रान हें मजबूत ठाणें पडलें व येथें पहिलें शीख युद्ध संपलें. नंतर लाहोर येथें तह झाला. या तहांत इंग्रजांनां सतलज व बियास दुआब व सव्वा दोन कोटी रु. युद्धखर्च मिळाला. या रकमेची भरपाई होण्याची आशा नसल्यामुळें बियास, सिंधु दुआब व काश्मीर आणि हजारा प्रांत इंग्रजांनीं घेतला. शीख सैन्य कमी करण्यांत आलें. लाहोरचें सर्व सैन्य काढून टाकून दुसरें इंग्रजांच्या विश्वसा चें सैन्य ठेविलें. या तहाच्या दुसर्‍या अटीमुळें सतलजनदीच्या दोन्ही कांठच्या मुलुखावरील ताबा इंग्रजांस मिळाला. जम्मूच्या गुलाबसिंगास इंग्रजांनीं आपला मांडलिक बनविलें व लाहोरास इंग्रजी रेसिडेंट व इंग्रजी सैन्य ठेवले गेलें. याच वेळीं गुलाबसिंग यास काश्मीर प्रांत देऊन त्याच्यापासून १ कोटी १२॥ लक्ष रु. घेण्याचा निराळा तह केला पण काश्मीरचा सुभेदार यानें इंग्रजांनां काश्मीर देण्याचें नाकारलें. तेव्हां इंग्रजांनीं दिवाण लालसिंग यास पदच्यत करून इंग्रजांनीं तेथें रीजन्सी कौन्सिल स्थापून तेथील रेसिडेंटाच्या सल्ल्यानें महाराजा धुलीपसिंगाचें राज्य चालवावें असें ठरलें. (१८४६).

वर वर जरी शांतता दिसत होती व राज्यघटनेचें काम सुरू होतें तरी लोकांत फार असंतोष माजला होता. गोवधाच्या मनाईचे हुकूम रद्द झाले होते व मुसुलमानांस पुन्हां पहिल्याप्रमाणें व्यक्तिस्वातंत्र्य मिळालें होतें. सैन्यांतून कमी झालेले शीख खेडोपाडीं पसरून उत्सुकतेनें लढाईची वाट पहात होते. अशा स्थितींत (१८४८) मुलतानचा माजी दिवाण मूलराज यानें लढाई पुकारली. यामुळें सर्व पंजाबभर धुमाकूळ माजला. मुलतान शहर इंग्रज सेनापतीनें वेढलें पण शिखांनीं तो वेढा उठविला. चतरसिंग आणि शेरसिंग या पुढार्‍यांनीं काबूलच्या अमीराची मदत मागितली. दोस्त महंमदानें लगेच पेशावर घेतलें व कांही सैन्य शिखांच्या मदतीसाठीं पाठविलें. तेव्हां लॉर्ड गोच्या आधिपत्याखालीं इंग्रजी सैन्यानें सतलज नदी ओलांडली. त्यानें शेरसिंगाचा रामनगर येथें पराभव केला. चिलियनवाला येथील लढाईत कोणीच हरलें नाहीं. पुढें शेरसिंग यास चतरसिंग हा अफगाण स्वारांसह येऊन मिळाला. इकडे गो यास व्हीग मिळाला व अखेरीस शीखांचा पराभव झाला. व १८४९ च्या मार्चात सर्व पंजाब प्रांत इंग्रजांनीं खालसा केला. धुलीपसिंगास ५०००० पौंड सालीना पेन्शन देण्यांत आलें. नंतर पंजाबचा राज्यकारभार एका बोर्ड ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडे सोंपविला. पुढें तेथें चीफ कमिशनरची योजना झाली. सर जॉन लॉरेन्स हा पहिला गव्हर्नर होय.

१८५७ मध्यें पंजाबमध्यें ३५००० हिंदि, १३००० पंजाबी, १०००० यूरोपीन व ९००० लष्करी पोलीस इतकें सैन्य होतें. बरेचसे यूरोपीयन पेशावर व अंबाला याच्या उत्तरेस होते. दिल्लीच्या कत्तलीची बातमी १२ मे रोजी लाहोरला आली व तेथील शिपायांत चळवळ सुरू झाली. पण १३३००० लोकांचीं शस्त्रें मियानमीर येथें काढून घेतलीं. गोविंदगड व फिलौर या किल्ल्यांत एकदम यूरोपीयन सैन्य भरण्यांत आलें. गोविंदगडहून अमृतसरवर मारा करतां येत असून फिलौर किल्ल्यांत दारूगोळा होता. १४ मे रोजी फिरोजपूर येथें २१ मे ला मरदान येथें, ७-८ जूनला जालंदर येथे, जुलैच्या पहिल्या आठवड्यांत झेलम, सियालकोट व पेशावर येथें असे सर्वत्र शिपायी लोक उठले. परंतु याच वेळीं १३००० शिपायांची शस्त्रें काढून घेण्यांत आलीं. इकडे सैन्याची अशी व्यवस्था करतांना दिल्लीस नव्या सैन्याची कुमक पाठविणें चालूच होतें. १७ मेच्या सुमारास पंजाबमध्यें पलटनवाल्यांसंबंधी लोकांत सहानुभूति राहिली नाहीं असें दिसून आलें. म्हणून पंजाबमध्यें नवीन १८ पलटणी तयार करण्यांत आल्या. सुरुवातीस चार यूरोपियन रेजिमेंटे दिल्लीस पाठविलीं. आगष्टमध्यें दिल्लीच्या कुमकेकरितां पंजाबांतून मोठें सैन्य पाठवावें लागलें. पंजाबमध्यें फक्त ४५००० गोरें सैन्य राखून ठेविलें होतें. यावेळीं आणीबाणीचा प्रसंग आला. दिल्ली लवकर सर न झाल्यास पंजाबमध्यें गडबड सुरू होण्याचा संभव होता. मरी येथील बंडाळी व रावी सतलज दुआबांतील गडबड यावरून इंग्रजी सत्तेच्या स्थायिकत्वाविषयीं लोकांचा विश्वास डळमळला आहे असें दिसून आलें. तेव्हां लष्करी जोरावर दोन्हीहि ठिकाणची गडबड दडपून टाकण्यांत आली व ता.१४ सप्टेंबरला दिल्ली शहर हातीं आलें. यामुळें पुढील सर्व धोका नाहींसा झाला.

या नानागर्दीच्या प्रसंगी पंजाबच्या सरदारांच्या राजनिष्ठेमुळें इंग्रजांनां जय मिळाला. जिंदचा राजा हा पलटणवाल्यांशीं लढण्यास सर्वाच्या आधीं तयार झाला. पतियाळच्या व नाभाच्या राजांनीहि पुष्कळ साहाय्य केलें. भावलपूरचा नबाब मात्र बिलकुल हलला नाहीं. बाकीच्या सर्व राजेरडवाड्यांनीं शक्य ती मदत केली. पुढें इंग्रजांनीं पतियाळा, जिंद व नाभा येथील राजांस इनाम म्हणून पुष्कळ जमीनी दिल्या व कपुरथळाच्या राजास अयोध्या प्रांतांतील एक तालुकदारी जहागीर बहाल केली.

यानंतर पंजाबची व्यापारी व औद्योगिक प्रगति झपाट्यानें झाली. १८५८ मध्यें यमुनेच्या पूर्वतीरावरील मुलुख व झाज्जरच्या नबाबाचा खालसा केलेला मुलुख व बहादुरगड या सर्वाचा मिळून वायव्येकडील प्रांत बनविण्यांत आला. बाकीच्या उरलेल्या प्रांतांत सध्यांचा दिल्ली प्रांत, रोरटक, गुगांव, हिस्सार, करनूळ व फिरोजपूरचा कांहीं भाग यांचा समावेश होत असे. १८५९ सालीं पंजाबमध्यें पहिला आगगाडीचा फांटा अमृतसर ते मुलतानपर्यंत झाला. व बारीदुआब कालवा सुरू करण्यांत आला. कांहीं डोंगरी लोकांवर केलेल्या निमलष्करी स्वार्‍या वगळल्यास पंजाबमध्यें त्यानंतर साधारण शांतता होती असें म्हणण्यास हरकत नाहीं. सर्वत्र कालवे झाले असून पुष्कळ नव्या रेल्वे तयार झाल्या आहेत. १९०१ सालीं वायव्यसरहद्दीकडील प्रांत बनविला गेला. यामध्यें सिंधु नदीच्या पश्चिमेकडील पंजाब प्रांताचा समावेश होतो. तरीपण यामध्यें मियानवाला जिल्ह्याची इसाखेल तहशील, डेरागाजीखान व ट्रान्स फ्रांटियरचा मुलुख यांचा समावेश होत नाहीं.

अवशेष- पंजाबमध्यें वैदिक संस्कृतीसंबंधी पुरातन वस्तूंचा कांहीच पत्ता प्रथम लागला नाहीं. पण अलीकडे हरप्पा येथें कांहीं अवशेष सांपडले आहेत. अशोकाच्या वेळेचे कांहीं अवशेष मात्र सांपडले आहेत. दिल्ली येथील स्तंभावरील कोरीव लेख हे त्यापैकीच आहेत. हे लेख पुरातन ब्राह्मी लिपींत आहेत. शाहबाझगढी व मानेश्वर येथील लेख मात्र दुसर्‍या लिपींत आहेत. शाहघेरी येथील तक्षशिला नगरीच्या अवशेषांवरून प्राचीन मौर्य राजांच्या राजधानीच्या मोठेपणाची साक्ष पटते. तक्षशिलेच्या आग्नेयीस मणिकयाल आहे. तेथील स्तूप हा फाहिआन यानें पाहिलेला स्तूप आहे असें कनिंगहॅम म्हणतो. याजवळच दुसरा एक स्तूप आहे, तो कनिष्काच्या वेळीं उभारला गेला असें त्यावरील खरोष्ठी लेखांत लिहिलें आहे.

कांग्रा जिल्ह्यांत कांही बुद्ध अवशेष सांपडले आहेत. त्यावरून ईशान्य पंजाबमध्यें हिमालयाकडच्या बाजूस बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता असें दिसतें. कन्हियारा (कृष्ण विहार) जवळील पथ्यार येथेंहि कांही कोरीव लेख सांपडले आहेत. हे खरोष्ठी व ब्राह्मी लिपींत आहेत. यावरून तेथें १-२ र्‍या शतकांत बुद्ध आश्रम होता असें दिसतें. चारसद्वा येथील लेखांत बौद्ध धर्माची तत्त्वें लिहिलेलीं आहेत. त्याचप्रमाणें तख्त-इ- बहाई येथील स्तूप व नगरहार येथील अवशेष बुद्धासंबंधीं आहेत.

पंजाबमध्यें पुरातन हिंदु वस्तू नाहींत. कारण या प्रांतांतील शहरें नद्यांच्या कांठावर असून तीं पुष्कळ वेळां वाहून गेलीं आहेत आणि मुसुलमापूर्व हिंदु वस्तूंचा समूळ नाश केला आहे. दिल्ली येथील जुम्मा मशीद २७ देवळें पाहून त्यांच्या सामुग्रीनें बांधली आहे. याच मशिदीमध्यें राजा चंद्र अथवा दुसरा चंद्रगुप्‍त याच्या वेळचा एक लोहस्तंभ आहे. हिमालयाच्या बाजूस मात्र पुरातन हिंदु देवळें आहेत. वैजनाथ व नुरपूर येथें पुरातन दगडी देवळें आहेत. कांग्रा येथील देवळें १९०५ मध्यें धरणीकंपानें नाश पावलीं कुलु येथील पाषाणलिंग देवळांत फार जुनें शिल्पकाम आहे आणि सतलज नदीवरील निरमंद गांवीं परशुरामाच्या देवळांत राजा समुद्रसेन याचा ताम्रपट आहे. मनाली येथें हिंडिबा देवीच्या देवळांत लांकडावर कोरलेल्या लेखांत सहाव्या शतकांत तें देऊळ बांधलें असा उल्लेख आहे. नगर येथील देवळांत लांकडी कोन आहेत. ही सर्व कांग्रा जिल्ह्यांत आहेत. चंबा संस्थानांतील बरमार व चित्रादि देवळें आठव्या शतकांत बांधलीं गेलीं आहेत. ह्या देवळाची तर्‍हा निराळ्या प्रकारची आहे. त्रिलोकनाथ (मंडी संस्थान) येथील देवळांत शारदालेख आहेत. क्षारडोंगरांतील मालेट व कठवार येथील देवळें काश्मिरी पद्धतीची आहेत.

मुसुलमानी अंमलांत शिल्पकामाची नवीन तर्‍हा सुरू झाली. पंजाबमध्यें ही तर्‍हा विशेष दृष्टीस पडते. कुवत उल्- इस्लाम, कुतुब मिनार, अल्तमशचें थडगें, अल्लाउद्दीन दरवाजा, दिल्लीची जमातखाना मशीद वगैरे पठाण्ण अमलांतील शिल्प दर्शवितात. मलिकपूर येथील अल्तमशच्या मुलाचें थडगें हेंहि प्रेक्षणीय आहे. तघलख राजाच्या वेळचें तघल्गाबाद, फैजाबाद वगैरेवरून निराळेंच शिल्प दिसून येतें. मुबारकपूर येथील मोतकी मशीद ही पठाण कारागीरीची प्रतिमा आहे. त्याचप्रमाणें इंद्रप्रस्थ येथील शेरशहाची किलाईकोना मशीद फार भव्य आहे. मोंगल लोकांनीं मुसुलमानी शिल्प कलेचें पुनरुज्जीवन केलें. अकबरानें हुमायूनचें बांदलेलें थडगें वगैरे प्रसिद्ध आहेत. मिहरलि येथें आदमखान याचें थडगें, तसेंच लाहोर येथील मोतीमशीद, निळा बुरूज, खानीखाना वगैरे स्थळें फार प्रेक्षणीय आहेत. शहाजहान यानें नवी दिल्ली बसवून तिचें नांव शहाजहानाबाद असें ठेविलें होतें. दिवाणी आम व दिवाणी ई-खास हे अति प्रसिद्ध आहेत. लाहौर येथें औरंगझेब यानें बादशाही मशीद बांधली. यानंतर लाहोर येथें एक आणि दिल्ली येथें तीन सोनरी मशीदी बांधण्यांत आल्या.

नैॠत्य पंजाबमध्यें शिल्पाची एक निराळीच तर्‍हा प्रचारांत आली. मुलतान येथील रुक्नुद्दीनच्या थडग्यावरून या शिल्पाची कल्पना होतें. १८०८ मध्यें मुझफरखान यानें शुजाबाद येथें जहाजीमहाल बांधला, तोहि प्रेक्षणीय आहे.

मध्यप्रांत, इतिहास- उत्तर हिंदुस्थानांतील लोक ह्या प्रदेशास गोंडवन ह्या नांवानें संबोधीत असत. रामायणकालीं राम दण्डकारण्याकडे जात असतां सुतीक्ष्ण ॠषीच्या आश्रमी कांही काळ विश्रांतीसाठीं राहिला होता. म्हणजे सध्यांच्या रामटेक टेंकडीवरच तो आश्रम असावा. अगदीं अलीकडे जेव्हां मुसुलमान लोकांच्या स्वार्‍या दक्षिणेवर झाल्या त्यावेळेस ते गोंडवनांतून न जातां पश्चिमेच्या बाजूनें अशीरगड किल्ल्याजवळून दक्षिणेंत उतरत असत.

इतिहासासंबंधीं संगतवार माहिती मिळण्याच्या पूर्वी येथें कांहीं कांही रजपूत घराण्यांनीं आपलीं राज्यें स्थापिलीं होतीं असें दिसतें. जबलपूर जिल्ह्यांत रूपनाथ येथें व सागर जिल्ह्यांत एरण येथें सांपडलेल्या अशोकाच्या शिलालेखांवरून असें दिसून येतें कीं साधारण तिसर्‍या किंवा चवथ्या शतकाच्या सुमारास वरील ठिकाणीं मगध येथील गुप्‍त घराण्यांची राज्यें असावींत. नागपूर व वर्धा ह्या प्रांताभोंवतालच्या प्रदेशांत इसवी सनापूर्वी दोन शतके विदर्भदेशचे हिंदु राजे इसवी सनानंतर २०० वर्षे त्याच प्रदेशावर राज्य करीत होते. त्यानंतर दक्षिणचे राष्ट्रकूट रजपूत त्याच प्रदेशांत ११ व्या शतकापर्यंत ठाणें देऊन होते.

नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेशांत रजपुतांच्या चेदि, चंदेल, चव्हाण या घराण्यांनीं बाराव्या शतकापर्यंत राज्य केलें. छत्तीसगडांत रजपुतांच्या हैहय घराण्यांनी रत्‍नपूर येथें राजधानी स्थापून ते बरेच दिवस तो प्रदेश राखून होते. याप्रमाणें जुन्या काळच्या लेखांवरून साधारण ११ किंवा १२ व्या शतकापर्यंतची माहिती उपलब्ध होते. त्यानंतर जवळ जवळ ३०० वर्षे ऐतिहासिक दृष्ट्या सुसंगत अशी माहिती मिळत नाहीं.

गोंड राज्याचा पहिल्या प्रथम उदय म्हटला म्हणजे चवदाव्या शतकाच्या शेवटीं सुरू होतो. बैतूल जिल्ह्यांत खेर्ला येथें प्रथम त्यांचें राज्य सुरू झालें. त्यानंतर त्यांच्याच घराण्यांतील नरसिंगराव यानें माळवा व खानदेश हस्तगत केले. पुढें गढामंडलच्या गोंड राजांनीं ५२ गड काबीज करून सागर, दमोह, भोपाळ, शिवनी येथपर्यंत राज्याचा विस्तार केला. हे मंडला घराणें साधारण ६७० च्या सुमारास उदयाल आलें व त्यानें १४८० पर्यंत टिकाव धरला. बन्नू बुलंद नांवाच्या एका गोंड राजानें छिंदवाडा प्रदेशांत देवगड येथें राज्य स्थापन केलें. त्यानेंच नागपूर शहर वसविलें आणि आपल्या राज्याचा विस्तार भंडारा, बालाघाटपर्यंत केला. दणिणेस एका निराळ्यास घराण्यानें चांदा येथें निराळें राज्य स्थापिलें. ह्याचा विस्तार वर्‍हाडच्याहि पलीकडे झाला होता. अशा तर्‍हेनें सर्व गोंडवनभर गढामंडला, देवगड व चांदा ह्या घराण्यांचीं साधारण एकाच वेळेस साम्राज्यें पसरलीं होतीं.

मोंगल साम्राज्याच्यावेळीं अकबरानें १६०० त अशीरगड किल्ला घेतला व पुढें जहांगीरनें आपलें ठाणें कांहीं दिवस पौनार, अष्टी, वर्धा ह्या ठिकाणीं ठेवलें होतें. तरी मोंगल साम्राज्यकालीं वरील घराणीं तग धरून राहिलीं होतीं. १७३३ त पेशव्यांनीं पहिल्या प्रथम बुंदेलखंडावर स्वारी केली व १७४२ त गढामंडल्यापर्यंत जाऊन येथील राजापासून चौथाई कर वसूल करण्यास सुरुवात केली. अशा तर्‍हेनें संग्राम सिंहापासून सतत ३०० वर्षे तग धरून राहिलेलें गढामंडलाचें राज्य १७८१ त नामशेष झालें. ह्यापेक्षांहि थोड्या काळांत चांदा व देवगडची राज्यें मोडकळीस आलीं. चांद सुलतानाच्या वेळेस गादीसाठीं भांडणें होऊन वर्‍हाडच्या रघूजी भोंसल्यास मध्यें पडावें लागलें. त्याने नागपूर येथें आपल्या राजधानीचें ठिकाण ठेवलें होतें. पुढें १७५१ मध्यें भोंसल्यांनीं देवगड, छत्तीसगड व चांदा येथें स्वार्‍या करून ते प्रांत काबीज केले. पहिली रघोजी १७५५ मध्ये मेल्यानंतर नागपूरचे राज्य विस्तारच पावत गेले. हे भोसल्यांचे राज्य पेशव्यांचे अधिपत्य मानण्यास नाखूष असल्याकारणाने रघोजीचा मुलगा जानोजी यास निजाम व पेशवे यांनी १७६१ मध्ये पराजित केले व त्यांच्यावर आपलें वर्चस्व प्रस्थापित केलें. १७८५ मध्ये त्या पुढील राजा मुधोजी याने नर्मदेच्या नजीकचा प्रांत काबीज केला व पुढें १७९६-९८ च्या सुमारास हुशंगाबाद, सागर, दमोह हे जिल्हे हस्तगत केले. ह्यानंतर दुसर्‍या रघोजीच्या वेळेस नागपूरचें राज्य फार विस्तार पावलें.

सन १८०३ पर्यंत भोसल्यांचें व इंग्रजांचें सख्य होतें. नंतर शिंद्यांशीं सलोखा करावा लागल्याकारणानें असई- अडगांव येथील लढाया होऊन देवगांवचा तह झाला व इंग्रजांस कटक, संबळपूर व वर्‍हाडचा कांही भाग द्यावा लागला. १८०३ पासून १८१८ पर्यंत राज्यांत बरीच अंदाधुंदी माजली. मुधोजीनें रघोजीच्या सुलांस मारविलें. व जेव्हां इंग्रज व पेशवे ह्यांच्यामध्यें वितुष्ट माजलें तेव्हां ह्यानेंहि इंग्रजांशीं शत्रुत्व संपादन केलें. १८१७ मध्यें सीताबर्डी येथें लढाई होऊन मुधोजीस नागपुरांतून पळ काढावा लागला. ह्या लढाऊनें इंग्रजांच्या ताब्यांत बराचसा प्रदेश आला. १८१८ पासून तों १८३० पर्यंत सर रिचर्ड जेंकिन्स यानें राज्यकारभार पाहिला त्यानंतर तिसर्‍या रघोडीस गादीवर बसविलें. परंतु त्याच्या मरणानंतर १८५३ मध्यें नागपूरचें राज्य खालसा केलें.

उत्तरेकडील प्रांतांपैकी १८१८ मध्यें मुधोजी (आप्पासाहेब) कडून मंडला, बैतूल, शिवनी व नर्मदा हे प्रांत इंग्रजांस मिळाले व पुढें बुंदेल्यांच्या बंडानंतर सागरकडील सर्व प्रांत इंग्रजांच्या राज्यास जोडला गेला. १८५७ च्या बंडामध्यें सागर, जबलपूर, गढामंडला, शिवनी या ठिकाणीं लहान लहान बंडें झालीं. परंतु कामठी येथील मद्रासच्या पलटणींनीं वेळेवरच जाऊन बंदोबस्त केला व नंतर सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली. १९०३ सालीं वर्‍हाड प्रांत निजामाकडून कायमच्या भाडेपट्टयानें घेऊन तो मध्यप्रांतास जोडून टाकिला. या वर्‍हाडप्रांताचा इतिहास मुख्य ज्ञानकोशांत (शरीरखंड विभाग १९-२०) दिलेलाच आहे.

अवशेष- हा प्रांत पुराणवस्तुसंशोधनाच्या दृष्टीने फारसा महत्त्वाचा नाहीं. जबलपूर जिल्ह्यांत रूपनाथ येथें अशोककालीन एक शिलालेख सांपडला आहे. तिगवन येथें सांची येथील स्तूपासारखा देवळाचा अवशेषभाग आहे. सागर जिल्ह्यांत एरण येथें प्राचीन कारागिरीचे कांही नमुने दिसून येतात. बुद्धकाळची एक कोरीव गुहा चांदा जिल्ह्यांत भादंक येथें आहे. मांधाता, मार्कडी, शिवनारायण येथें ब्राह्मणी पद्धतीचीं उत्तम देवळें आहेत. हेमाडपंती देवळें सर्व प्रांतभर थोड्याबहुत प्रमाणानें आढळून येतात. मुसुलमानी शिल्पकलेची कांही दृष्यें बर्‍हाणपूर येथील कांहीं मशिदीमध्यें दिसून येतात. शिल्पकलेच्या दृष्टीनें कमी महत्त्वाच (गोंड राजांच्या वेळच्या) कांही इमारती रायगड व गढी येथें आहेत. मराठ्यांच्या व बुंदेल्यांच्यावेळचे किल्ले सर्व ठिकाणीं आहेत.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे