बुंदेलखंड

बुंदेलखंड

विभाग आठरावा : बडोदें ते मूर

बुंदेलखंड (ब्रिटिश)- संयुक्तप्रांतांत, जलौन, झांशी, हमीरपुर व बांडा हे जिल्हे, आणि गंगा व यमुना यांच्या दक्षिणेकडील अलाहाबादचे भाग मिळून होणारा प्रदेश. क्षेत्रफळ ११६०० चौरस मैल. येथें राहणा-या बुंदेला ठाकूर जातीच्या नांवावरून हें नांव पडलेलें आहे. बुंदेला हा शब्द एका गहरवाडानें केलेंल्या आत्मयज्ञाच्या प्रयत्नाला अनुलक्षून प्रचारांत आलेला असावा असा समज लोकांत प्रचलित आहे. विध्यांचल येथें विध्यवासिनी देवीच्या समोरील यज्ञवेदीवर पडलेल्या त्याच्या रक्तबिंदू(बुंद) पासून त्याचा मुलगा उत्पन्न झाला; म्हणून त्याच्या वंशजांनां बुंदेले हें नांव प्राप्त झालें.

स्वा भा वि क व र्ण न.- पूर्वविंध्य पर्वताची विंध्याचल नांवाची उत्तर रांग झांशी, बांडा व अलाहाबाद यांच्या दक्षिणेकडून गेली असून तिची उंची कोठेंहि २००० फुटांपेक्षां जास्त नाहीं. ह्या डोंगरांतून उत्तरेकडे व ईशान्यकडे पुष्कळ नद्या जातात; त्यापैकीं बटवा, घसाना बिरमा, केन बाघेन, पैशुनी व दक्षिण तान्सा या मुख्य आहेत. टेंकड्या व यमुनानदी यांच्यामध्यें ''मार'' नांवाची काळी जमीन असून ती गव्हाला फार चांगलीं आहे. झांशीपासून ललितपूरपर्यंत राकर नांवाची तांबडी किंवा पिवळी जमीन आहे.

इ ति हा स.- ऐतिहासिक काळपूर्वींच्या मनुष्यांचीं दगडी हत्यारें बांड्यामध्यें सांपडलीं आहेत. पूर्वीं ह्या प्रदेशावर रजपुतांचें राज्य होतें असें अगदीं जुन्या दंतकथेवरून समजतें. ह्याच्यासंबंधीं खात्रीलायक इतिहास मिळत नाहीं; पंरतु द-यांच्या अरुंद टोंकांवर भिंती घालून तयार केलेंल्या अंसख्य तळ्यांपैकीं बिन घडविलेल्या दगडांचे बांध असलेलीं तळीं त्यांनीं बांधिलीं असें म्हणतात. महोबाच्या पूर्वेस ३ मैलांवर असलेलें विजयानगर नांवाचें तळें सर्वांत मोठें आहे. गहरवाडाच्या मागून परिहार व चंदेल घराणीं झालीं. चंदेल घराण्याची माहिती 'चंदेल्ल' या नावाखालीं (वि. १३) स्वतंत्र आढळेल.

बुंदेले लोक हे आत्मयज्ञाचा प्रयत्न करणा-या पंचम नांवाच्या एका गहरवाडाचे वंशज होत अशी समजूत आहे, पण त्यांच्या उत्पत्तीचा खरा इतिहास अज्ञात आहे. बहुधां चवदाव्या शतकांत त्यांनीं सत्ता प्राप्त करूंन घेण्यास आरंभ केला. प्रथम ते महू येथें व नंतर कालिंजर आणि काल्पी येथें राहूं लागलें. पश्चिम बुंदेलखंडांत जसजशी त्यांची सत्ता वाढत गेली तसतसे मुसुलमान लोकांशीं त्यांचे तंटे होऊं लागलें १५०७ च्या सुमारास रूद्रप्रताप हा त्यांचा मुख्य होता; त्याला बाबरनें सुभेदार नेमिलें. त्याच्या मुलांपासून बुंदेल्यांचीं बहुतेक प्रसिद्ध घराणीं निघालीं. १५४५ त शीरशहानें बुंदेलखंडावर स्वारी केली असतां कालिंजरच्या वेढ्यांत तो मरण पावला. इस्लामशहानें चंदेल घराण्यांतील शेवटचा राजा किरातसिंग याला ठार मारून तो किल्ला सर केला; पण तो पुन्हां बुंदेल्यांच्या हातांत पडला व अखेर स. १५६९ त अकबरानें तो आपल्या ताब्यांत घेतला. ह्यावेळीं बुंदेल्यांत दुफळी झालेंली होती तरी त्यांनीं बादशाही सैन्याविरूद्ध पुष्कळ प्रसंगीं टिकाव धरला. ओर्छाचा राजा बीरसिंगदेव यानें सेलीम (जहांगीर) च्या सांगण्यावरून अबुलफझलचा खून करण्याचा प्रयत्न केल्यामुळें त्याजवर अकबराची बरीच गैरमर्जी झालीं. व जरी जहांगीराच्या कारकीर्दींत त्याजवर बादशहाची मर्जी होती तरी, शहाजहाविरूद्ध त्यानें बंड केल्यामुळें त्याचा सर्व प्रदेश जप्त झाला. बुंदेलखंडाच्या मध्य भागावर महोबा येथून चंपतराय राज्य करीत होता; तो बीरसिंगदेवाच्या बंडांत सामील झाला. व जरी त्याच्यावर आग्रा, अलाहाबाद व दख्खन येथील सैन्यानें हल्ले केलें तरी त्यानें त्यांशीं बट्वा नदीजवळ गनिमी काव्याची लढाई चालू ठेविली. अखेर बादशहाच्या हाताखालीं नोकरी स्वीकारून त्यानें जालौनमधील कुंचवा परगणा मिळविला व पुढे सामीगडच्या लढाईंत औरंगझेबास मदत केल्यामुळें त्यास आणखी देणग्या मिळाल्या; पण मर्जींतून उतरल्यामुळें त्याच्या बायकोच्या आप्तांकडून त्याचा खून करण्यांत आला. चंपतराय याचा मुलगा छत्रसाल हा लवकरच बुंदेल्यांचा मुख्य पुढारी होऊन थोड्याच वर्षांत हल्लीं ज्याला ब्रिटिश बुंदेलखंड असें म्हणतात, त्यापैकीं बहुतेक प्रदेश त्याच्या ताब्यांत आला. त्याची कारकीर्द 'छत्रसाल' नांवाखालीं सांपडेल. त्यानें आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा (झांशी व जालौन) मराठ्यांस नेमून दिला. पुरंदरच्या तहानंतर सुरू झालेंल्या मराठा युद्धांत ब्रिटिश सैन्य प्रथम बुंदेलखंडांत शिरलें. त्यांनतर बुंदेल्यांनीं मराठ्यांनां घालवून लावण्याचा थोडासा प्रयत्न केला.

पुढे हिंमतबहादुर नांवाचा गोसावी व बाजीरावाचा दासीपौत्र अलीबहादुर ह्यांनीं बुंदेल सरदारांचा पाडाव करण्याचा घाट घातला. एकंदर १७९० पासून १८०२ पर्यंतच्या झटापटींट अलीबहादुर हा कालिंजर घेण्याच्या प्रयत्नांत मरण पावला. १८०२ सालीं झालेंल्या वसईच्या तहांत पेशव्यानीं जो प्रांत ब्रिटिश सरकारास तोडून दिला त्याच्या मोबदल्यांत पुढें बुंदेलखंडाचा कांहीं भाग ब्रिटिशांनीं घेतला. व दुस-या एका तहानें आणखी कांहीं भाग घेतला. परंतु इतर मराठा सरदारांनीं हा तह मानण्याचें नाकारलें. अलीबहादुर याचा पुत्र समशेरबहादुर ह्यानें बुंदेलखंड, मिरझापुर व बनारस हे जिल्हे उध्वस्त करण्याचा बेत  केला. हिंमतबहादुर हा मराठ्यांची बाजू सोडून ब्रिटिशांस मिळाला व त्याबद्दल त्यास अलाहाबाद व काल्वी यांच्या दरम्यानच्या यमुनाकांठीचा प्रदेश मिळाला. ह्या दोघानी मिळून समशेरबहादूरास बट्वाच्या पलीकडे हांकून दिलें व १८०३ सालीं काल्पी घेतलें. पुढें सनशेरबहादुर हा बांडा येथील नामधारी नबाब नेमला गेला. व त्यास ४ लाख रूपये पेन्शन देण्यांत आलें. सन १८०४ च्या अखेरीस अशा रीतीनें सर्वच शांतता झालीं. कालिजर १८१२ सालीं घेण्यांत आले. तदनंतर जो भाग बुंदेलखंडास जोडण्यांत आला तो बेवारशी तत्त्वाप्रमाणें मिळविण्यांत आला. पुढें १८८६ सालीं ग्वाल्हेरचा किल्ला मुरार शिंद्यास देऊन त्याऐवजीं झांशी घेण्यांत आलें.

बुंदेलखंडची लो. सं. २४४०००० असून शें. ९३ लोक हिंदु आहेत. मराठे लोकांच्या लहान लहान जहागि-या आहेत. पण त्यांनां फारसें महत्व नाहीं. बांडाच्या बाजूला बाघेली व औधी ह्या भाषा प्रचारांत असून झांशी- हमीरपूरच्या बाजूस बुंदेली भाषा बोलतात.

शरद्ॠतूंत ज्वारी व कापूसहि होतो. व वसंतॠंतूत हरभरे होतात. पाऊस चांगला पडला तर रब्बीचें पीकहि चांगलें येतें. संबंध प्रांतांत एकच कालवा आहे. पाऊस फारसा पडत नाहीं.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे