लदख - काश्मीर. हिमालय पर्वताच्या अगदीं पश्चिमेकडील प्रांताला लदख हें नांव पडलें.
विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लदख - काश्मीर. हिमालय पर्वताच्या अगदीं पश्चिमेकडील प्रांताला लदख हें नांव पडलें. सांप्रत काश्मीर संस्थानचा तो एक भाग बनलेला असून हिमालय व कैनलून पर्वत आणि बाल्टिस्तान व चिनी तिबेट यांच्यामधील प्रदेशाचा यांत समावेश होतो. पृथ्वीवरील अतिशय उंच प्रदेशांपैकीं लदख प्रांत हा एक आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून ९००० पासून १४००० पर्यंत आहे. सिंधुनदाच्या आसपासचा प्रदेश मध्यलदखांत मोडत असून हाच प्रदेश फार महत्त्वाचा समजला जातो.
लदखमध्यें वनस्पति अथवा झाडें फारशीं नाहींत. जळाऊ लांकडे मिळण्याची अडचण पडते. लहान झुडुपांवर लोक आपलें काम भागवून घेतात. जमीन नापीक होते म्हणून झाडें लावण्याचा प्रतिबंध असतो. सरासरी १७००० फुटांवर सपाट प्रदेशांत जंगली याक (एक जनावर), काळवीट जंगली गाढवें व नाना प्रकारची बकरीं आढळतात. याच्याहि वर १९००० फूट उंचीवर ससे व चित्ते असतात. येथील हवा कोरडी असून निरोगी आहे. पाऊस अगदीं कमी. बर्फ मात्र अतिशय असतो. रूपशू भागांत सप्टेंबर महिन्यांत पारा ९ अंशापर्यंत उतरतो.
इतिहास.- १९ व्या शतकांत राजा गुलाबसिंगानें लदख प्रांत जिंकीपर्यंत तिबेटाकडे सदर प्रांत वहिवाटीस होता. १७ व्या शताकांत सोकपोस नांवाच्या मोंगल पठाणांनी लदखौ लोकांनां फार त्रास दिल्यामुळें त्यांनी काश्मीरच्या महाराजांची मदत मागितली. महाराजांनी ताबडतोब कुमक पाठविली व सोकपोस लोकांनां हांकलून दिलें. काश्मीरच्या महाराजानां याबद्दल कांहीं खंडणी मुक्रर केली आहे. लदखमध्यें पुष्कळ मठ असून त्यांत सिंधूच्या डाव्या तीरावरील हिमिसगुंफा नांवाचा मठ मुख्य आहे. या मठांत ४०० पासून ८०० पर्यंत गोसावी व गोसाविणी आहेत.
लदखप्रांताची मुख्य राजधानी लेह असून त्याची लोकसंख्या २००० आहे. या प्रातांत खेडीं ४६३ आहेत. येथील लोक सत्यवादी व प्रामाणिक असतात. लदखी शेतकरी मोठया काळजीनें शेतकींचे काम करतात. यांच्यांत पोटभेद असतात. एका पोटवर्गांत लग्नें आपपसांत होत नाहीत. लदखी लोकांत बायकांनां विशेष हक्क आहेत. त्यांनां वाटेल तितके नवरे करण्याची मोकळीक असते. लेह शहरांत अर्जुन लोक पुष्कळ आहेत. अर्जुन लोकांचे मूळ असें कीं, काश्मीरी, तुर्की किंवा डोग्री मनुष्यापासून लदखी स्त्रीला झालेलें मूल अर्जुन होय. यांनां गुलामजादे असेंदि म्हणत.
येथील जमीन रेताड आहे. मुख्य पिकें गंहू, जब, वाटाणा, राई असून लुसर्न नांवाचें गवत गुरांकरितां उपयोगांत आणतात. लोंकरीच्या जिनसा पुष्कळ करतात. मठापासून शेतकरी लोकांनां तकवी मिळते. गरीब लोकांनां कर्ज कायतें मठापासून मिळतें. एरव्हीं कोणीहि देत नाही. कोणा शेतकर्याला जर अतिशय कर्ज झालें तर कुळाच्या जमिनींपैकीं अर्धी जमीन ३ वर्षेपर्यंत मठ वाहातो. तेवढया मुदतींत कर्जाची फेड झाली नाहीं तर सर्व जमीन कुळाच्या हवालीं करून त्याला कर्जमुक्त करतात. परंतु कोर्टात फिर्याद करीत नाहींत किंवा कायमची जमीन घेत नाहींत.
Comments
Post a Comment