लोहगड किल्ला -

लोहगड किल्ला - कार्ल्याची लेणी असलेल्या डोंगरापासून दक्षिणेस चार मैलांवर व खंडाळ्याच्या आग्नेयीस आठ मैलांवर इंद्रायणीच्या खोर्‍यामध्यें लोहगड व विसापूर हे दोन किल्ले आहेत. लोहगडाकडे जवळून पाहिलें तर एका बाजूस एक नोकदार खडक आहे. त्यास 'विंचु कांटा' म्हणतात. गडावर आंत शिरण्यास गणेश, नारायण, हनुमंत व मोठा असे चार दरवाजे आहेत. शेख उमरच्या कबरीजवळ दरसाल पौषी पौर्णिमेस मोठी जत्रा भरते. ह्या कबरीच्या पश्चिमेस त्र्यंबकेश्वर महादेवाचें एक जुनाट पडकें देवालय आहे. लोहगड हा दक्षिणेतील मोठा मजबूत व बराच प्रसिद्धीस आलेला एक किल्ला आहे. बोरघाटाच्या तोंडावर हा किल्ला असल्याकारणानें तर ह्यास बसेंचसें महत्त्व प्राप्त झालें आहे. शिवाय येथें बरीच लेणी असून ती बौद्ध काळचीं (ख्रिस्तपूर्व २००-इसवी सन २०० पर्यंत) असावी. १४८९ सालीं मलिक अहंमदनें हा किल्ला आपल्या ताब्यांत घेतला होता. ह्यानंतर सन १५६४ मध्ये बुर्‍हाण निझामशहा दुसरा (हा पुढे १५९० ते १५९४ या कालांत अहमदनगरचा राजा झाला) ह्यास त्याच्या भावानें आपल्या कारकीर्दीत येथें कोंडून ठेविलें होते. १६३७ मध्यें अहमदनगर येथील घराण्याचा र्‍हास झाल्यावर, लोहगड हा विजापूरच्या राजांच्या ताब्यांत गेला व लवकरच शिवाजीनें त्यांच्या कढून तो घेतला (१६४८). पण सन १६६५ मधील जयसिंग व दिलेरखान यांच्या जयानंतर, शिवाजीला औरंगझेबास लोहगड किल्ला द्यावा लागला. पुढें पांच वर्षांनीच (१६७०) तानाजी मालुसरे यानें सिंहगड घेतल्यानंतर मराठयांचा मोर्चा लोहगडाकडे वळला. १७०४ मध्यें मराठयांनी लोहगड घेतला व १७१३ मध्ये तो आंग्र्यांच्या हाती गेला व सन १७२० मध्यें बाळाजी विश्वनाथाकडे आला. स. १७७० मध्यें हा किल्ला जावजी बोम्बले नांवाच्या कोळी नायकाकडे आला. दुस र्‍या बाजीरावाच्या वेळीं नानांकडे कारभार असतां त्यानीं कोणी आपला आश्रित धोंडोपंत ह्यास लोहगडचा किल्लेदार नेमलें. सन १८०० मध्यें नानांच्या मरणानंतर त्यांची भार्या लोहगडास जाऊन राहिली. १८०३ मध्यें वेलस्ली साहेबाच्या मध्यस्थीनें हा किल्ला पेशव्यांकडे परत आला. मराठयांशीं झालेलया शेवटच्या युद्धांत कर्नल प्रायर ह्यांने विसापूर व लोहगड हे किल्ले घेतले. स. १८४५ पावेतों ह्या किल्ल्यावर सैन्याची तुकडी ठेवण्यांत आली होती. ५०० लोक ह्या किल्ल्यावर सहज राहूं शकत.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे