पुणें, जिल्हा.- मुंबई इलाखा.

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें   
    
पुणें, जिल्हा.-  मुंबई इलाखा. क्षेत्रफळ ५३५० चौरस मैल. लोकसंख्या (१९२१). १००९०३४. याच्या उत्तरेस नगर जिल्हा; पूर्वेस नगर व सोलापूर जिल्हे; दक्षिणेस नीरां नदी आणि फलटण व भोर संस्थानें; आणि पश्चिमेस कुलाबा, ठाणें व भोर संस्थान आहे.

नद्या व घाट:- पश्चिमेस बहुतेक सह्याद्रीची रांग आहे. त्यांतून कोंकण व देश यांच्यामध्यें पुष्कळ घाट आहेत; त्यांपैकीं नाणेंघाट; पोखरीचा, केंदूरचा, कात्रजचा, बाबदेवचा, दिव्याचा व बोरघाट हे मुख्य आहेत. बोरघाटामधून बैलगाडी व आगगाडी जाण्या- येण्याचे रस्ते बोगदे कोरुन केलेले आहेत. बोरघाट हा ख्रि.पू १०० ते इ.स. ३०० पर्यंत विशेष रहदारीचा रस्ता होता. घाटामधून बर्‍याच लहान लहान नद्या वाहतात. घोड, भीमा, भामा, वेळ, पवना, कर्‍हा, नीरा, इंद्रायणी, मुळा, मुठा, वगैरे लहानमोठ्या नद्या पश्चिमेकडील घाटांत उगम पावतात. आणि बहुतेक सर्व भीमेस मिळतात. पुणें शहराला पाण्याचा पुरवठा खडकवासला तलावापासून मुख्यत्वेंकरुन होतो.

किल्ले:-  हरिश्चंद्रगड, शिवनेरी, नारायणगड, लोहगड, विसापूर, सिंहगड, पुरंदर, मल्हारगड व वज्रगड, हे आहेत. दक्षिणेस, पर्वत व उत्तरेसहि पर्वत आणि वरघांट, मध्यभागीं पुणें, आसपास घाट व त्यांतून निघणार्‍या नद्या, नाले यामुळें एकंदर जिल्ह्याला व विशेषेंकरुन पुणें शहराला विशेष नैसर्गिक सौंदर्य आलेलें आहे.

जमीन व मावळें:- दक्षिणोत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग डोंगराळ व उंचवटयावर असून त्यांत खोल खिंडी आहेत. त्याच्या तळाशीं पुष्कळ जमीन सपाट व सुपीक आहे. या खिंडीनां त्यांतून वाहणार्‍या नद्यांवरुन किंवा गांवांवरुन नांवें पडलीं आहेत. उत्तरेकडे त्यास नेर म्हणतात; उदा० घोडनेर, भीमनेर, भामनेर; मध्यभागीं त्यांना मावळ म्हणतात; उदा. नाणेंमावळ: दक्षिणेकडे त्यांस खोरें म्हणतात; उदा० पौंड खोरें, मुसाखोरें. पूर्व- पश्चिम प्रांत सपाट आहे.

पीक:-  सह्याद्रीच्या उंचवटयावरून नद्यांबरोबर खालीं गाळ येतो व तो खोर्‍यांत बसतो. त्यामुळें ही खोरीं सुपीक आहेत त्यांत उत्तम भात व थोडें कडधान्य होतें. उत्तरेकडील सर्व भाग बागाईत आहे. यांतील घाटांत वनस्पती असंख्य आहेत. जिल्ह्याच्या कांहीं भागांत बागबगीचे आहेत. कांही तालुके डोंगराळ असल्यानें जेथें नेहमीं दुष्काळाची भीति असते तेथें कालवे काढले आहेत. आंबे, जांभळे, पेरू, कागदी लिंबें, संत्रीं, केळीं, अंजीर, द्राक्षें, डाळिंबें वगैरे फळें बरींच पिकतात. गहूं, हरभरा, ज्वारी, मूग, मटकी, हीं धान्यें होतात. बागाइतींत ऊंस, भुईमुग, बटांटे, कांदे, विडयाचींपानें वगैरे होतात.

वाघ, चित्ते व अस्वलें या वन्यपशूंची संख्या कमी आहे. मात्र हरणें व सांबर आढळतात. समुद्रसपाटीपासून पुणें भाग १८०० फूट उंच आहे. उष्णमान नवंबर महिन्यांत ४८ आणि मे महिन्यांत १०८वर असतें. जुन्नर, खेड, हवेली आणि मावळ तालुक्यांत पाऊस जास्त असतो. मधील पट्टयांत कमी असून लोणावळे- १८५ इंच व पूर्वेकडे सरासरी २० इंच असतो.

उत्पन्न:- लहानमोठे तलाव आहेत, दोन मोठे कालवे एक मुठेचा व दुसरा नीरेचा; मुठेच्या कालव्याचे दोन फांटे आहेत. पुणें शहराजवळून जातो तो १८ मैल लांब आहे. नीरेच्या कालव्याचेहि फांटे काढलें आहेत. भाटघर गांवीं बांधलेल्या तलावांतून कालवा काढला आहे. त्याची लांबी १०३ मैल आहे. या कालव्यामुळें हवेली पुरंदर, भिमथडी व इंदापूर या तालुक्यांत बागाईत वाढलें; गूळ मोठ्या प्रमाणांत होऊं लागला. या जिल्ह्यांत ३७ ठिकाणीं लुगडी व जाडेंभरडें कापड निघतें. जुन्नरास सुडाचे कागद होतात. पुण्यास तांब्यापितळेचीं भांडी, रेशमी व सुती लुगडीं विणणें, जरीचें कापड, कलाबतु, बांगडया, हस्तिदंती फण्या, मातीचीं चित्रें, फीत विणणें, बुरणूस, येरवडा तुरुंगांतील कापड वगैरे जिन्नस तयार होतात. मुंढवें येथें कागदाची गिरणी आहे (हल्लीं (सन १९२५') बंद)  मुख्य भाषा मराठी. शेतकी हा मुख्य धंदा. जमीन मोजणींत प्रथम हेमाडपंती, नंतर मलिकंबरी, मग दादाजी कोंडदेवाची, पुढें नाना फडणळिसाची व शेवटीं इंग्रजांची इतके प्रकार झालें.

राज्यव्यवस्था:-  जिल्ह्यांत जुन्नर, खेड, मावळ, हवेली, शिरुर, पुरंदर, भिमथडी व इंदापूर हे ८ तालुके व आंबेगांव, मुळशी, दौंड, हे ३ पेटे आहेत. पुणें येथें कलेक्टर, डिस्ट्रिक्ट जज्ज वगैरे जिल्ह्याचे अधिकारी आहेत. पुणें, वडगांव, तळेगांव ढमढेरे, जुन्नर, खेड, सासवड येथें मुन्सफ कोर्टे आहेत. खडकी, घोरपडी व वानवडी येथें लष्करी छावण्या आहेत. जिल्ह्यांत म्युनिसिपालिटया ११, जिल्हाबोर्ड, व ८ तालुकालोकलबोर्डे आहेत. एकंदर गांवें ११८९ आहेत.

इतिहास:-  पुण्याचा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासांत मोडतो. येथें अगदीं त्रोटक सारांश देतों. या जिल्ह्यांत जुन्नर हें ठिकाण फार प्राचीन आहे. येथें ज्या ज्या राजांचा अम्मल झाला त्यांचीं नांवें पुढील प्रमाणें: आंध्रमृत्य (ख्रि.पू. १ ल्या शतकापर्यंत); राष्ट्रकूट (इ. स. ७६० पर्यंत); राष्ट्रकूट (९७३ पर्यंत); देवगिरीकर यादव (१२९५ पर्यंत); मुसुलमान (१६०० पर्यंत); मराठे (१८१८ पर्यंत) , व सांप्रत इंगज.

मांजरी व बोपुडी येथें सरकारी शेतें व खडकीस दूध दुभतें कारखाना (डेअरी) आहे. व्यापार्‍यांत ब्राह्मण, गुजराथी मारवाडी, बोहरी, पारशी यांचा भरणा आहे. लोकसंख्येंत मराठे हे शेंकडा ३४, ब्राह्मण ६, मुसुलमान. .०४, व ख्रिस्ती .००७, व बाकीचे इतर जातीचे म्हणजे हिंदु वगैरे आहेत. शेंकडा ७.५ लोक साक्षर आहेत. पुणें येथें बरींच कॉलेजें व दुय्यम व प्राथमिक शिक्षणाच्या शाळा आहेत. बोरघाट व नाणेंघाट हे व्यापारी दळणवळणाचे मुख्य मार्ग आहेत.

सारा आकारणी:- इंग्रजी अंमलाच्या पूर्वी शेंत जमीन जथा व थल या नांवाखाली विभागली होती व तिचा सारा जथेकरी व थलकरी यांनीं सरकारांत भरावयाचा असें. प्रत्येक गांवांत असे १० । १२ जथेकरी व थलकरी असत आणि त्यांच्यांतच त्या त्या खेडेगांवची सर्व शेतजमीन विभागली जाई. एखाद्या जाधवानें अथवा पवारानें बरीचशीं शेतें आपल्याकडे लावून घेतल्यास त्यास जाधवथळ अथवा पवारथळ म्हणत, म्हणजे त्या शेतांचा सारा ह्या जाधवानें अथवा पवारानें भरावयाचा. अशा तीनचार कुंटुंबांनीं जी शेतें घेतलीं असत त्यांस जाधव- पवारजथा म्हणत. मलिक अंबर सारापद्धति ही सर्वसाधारण दर बिघ्यास १३।१६ मण धान्य अथवा १ रुपया ५।। आणे असे. दादाजी कोंडदेवी पद्धतींत २।५ अथवा १।२ सरकारसारा असे. मोंगल अमलांत बढाई म्हणजे निमें उत्पन्न सरकारी असे व बागाइतींत पाटस्थळास ११८४ दर बिघ्यास व मोटस्थळास ७८८ सारा असे शिवाजींनें बागाइतींत हे दोन्ही दर कायम ठेवले व कोरडवाहूचा सारा १।३ ठरविला (२।३ शेतकर्‍याचा वाटा). पेशवाईत नानाफडणिसाच्या वेळीं, मळ्यास (मोटस्थळास) दर बिघ्यात ३रु. व बागेस (पाटस्थळास) दर बिघ्यास ६ रु. कोरडवाहूस उत्तम जमीनींस बिघ्यामागें २रु; मध्यमप्रकारांस १८४ रु: कनिष्ठ प्रतीस १ रु. आणि निकृष्ट जमिनीस ८१२ असे सार्‍याचे दर होते. इंग्रजी अम्मल झाल्यावर पहिली पाहणी १८१८ त झाली. परंतु त्यावेळी व पुढें १८२०,३१,३५ व १८५६ सालची पाहणीहि अपुरी झाली. प्रथम दर एकरास उत्तम, मध्यम व कनिष्ठ जिराइती जमीनीस १८६ ते १ रु. व ८१३ व बागाइतीस ४ रु. ठरविले होते. पुढें १८७४ व १९०१ मध्यें पुन्हां पाहणी होऊन पुढील दर ठरले- कोरडवाहू दर एकरीं ८९; भातजमीन २८७ व बागाईत २ रुपये.

शहर.- पुणें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. मुंबईच्या आग्नेयीस ११९ मैल. हें समुद्रसपाटीपासून १८५० फूट उंच आहे. दहाव्या शतकांतील राष्ट्रकूटांच्या एका ताम्रपटांत याचें पूनकवाडी असें नांव येतें. मालोजीला जहागीर मिळालेल्या प्रांतांत हें गांव होतें (१६०४), नंतर शहाजीनें याची दादोजी कोंडदेवाकडून वसाहत करविली (१६३७). दादोजीनें येथें आपलें मुख्य ठाणें करुन शिवाजीसाठीं (राजमहाल नांवाचा) वाडा बांधला. राजगड घेईपर्यंत शिवाजीचें ठाणें पुण्यास होतें. तदनंतर थोरल्या बाजीरावानीं पुणें हें आपलें राहण्याचें मुख्य ठिकाण करीपर्यंत त्यास विशेष महत्त्व नव्हतें. नानासाहेब पेशव्यांच्यापासून त्याच्या भरभराटीस प्रारंभ होऊन सवाईमाधवरावांच्या वेळीं ती शिखरास पोंचली होती. रावबाजीपासून तें मोडकळीस आलें; आणि सांप्रत तें जरी मुंबई इलाख्याची दुय्यम राजधानी आहे तरी त्याचें गेलेलें वैभव पूर्णपणें दृष्टिगोचर होत नाहीं. पेशवाईंत मोठ्या अशा सात पेठा होत्या. येथील म्युनिसिपालिटी स. १८५७ त स्थापन झाली. मुळामुठेचा संगम शहराजवळच आहे. दक्षिणहिंदुस्थानचें मुख्य लष्करी ठाणें येथें असतें. जून ते आक्टोबरअखेर मुंबई सरकारचें ठाणें येथें आहे. लो. सं. (१९२१) २१४७९६. पावसाचें मान ३२ इंच असतें. शिक्षणाची सोय येथें चांगली आहे. डेक्कन, फर्ग्यूसन, न्यूपना, शेतकी, इंजिनियरिंग हीं कॉलेजें असून हायस्कुलें व देशी भाषांच्या शाळा (मुलांच्या व मुलींच्या) बर्‍याच आहेत. प्राथमिक शिक्षक व शिक्षकिणी तयार करणार्‍या दोन शाळा आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या संस्था व कारखाने आहेत. महाराष्ट्रांतील प्रमुख वर्तमानपत्रें व मासिके (मुंबई शहर सोडल्यास) येथें निघतात. सुखवस्तु कुटुंबांस सर्व दृष्टीनें राहण्यास हें शहर सोयीचें आहे. महाराष्ट्रांतील बहुतेक निरनिराळ्या प्रकारच्या चळवळींचा प्रारंभ पुण्यास होतो; हें विद्वानांचें माहेरघर आहे. येथें पाहण्यालायक जुनीं व नवीं अनेक स्थळें आहेत. पेशवाईंतील संपत्ति नष्ट झाल्यानें सांप्रत त्यावेळच्या मानानें हें निर्धन झालें आहे. त्यावेळचीं सर्व सावकारघराणीं बसून गेलीं. मुंबई, अहंमदाबाद, सोलापूर वगैरे शहरें पुण्याच्या मानानें धनवान आहेत. व्यापारी शहर म्हणून जरी याची ख्याति संपली तरी अद्यापि कांही धंदे जीव धरुन आहेत. सांप्रतच्या सारावसुलीच्या पद्धतीनें सावकार व कुळें दोघेहि जास्त निर्धन बनले आहेत. येथें स. १८५८ त आगगाडी सुरू झाली.

Comments

Popular posts from this blog

चालुक्य घराणे

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे

कदंब घराणे